ताज्या घडामोडी

2024 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी अहमदपूर मतदारसंघामध्ये मतदान यंत्राविषयी जनजागृती मोहिम

चाकूरात तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्याहस्ते शुभारंभ,चाकूर तालुक्यातील प्रत्येक गावात प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी पोहचणार मोबाईल व्हॅन

चाकूर : 16 डिसेंबर /मधुकर कांबळे
निवडणूक विभागाकडून 2024 च्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी अहमदपूर मतदारसंघामध्ये मतदान यंत्राविषयी जनजागृती मोहिम राबविण्यात येणार असून चाकूरात सोमवार दि.11 डिसेंबर 2023 रोजी या मोहिमेचा तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्याहस्ते शुभारंभ करण्यात आला.चाकूर तालुक्यातील प्रत्येक गावात मोबाईल व्हॅन जाणार असून याद्वारे मतदारांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दि. 10 डिसेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत संपूर्ण राज्यभरामध्ये ई. व्ही. एम. व व्ही. व्ही. पॅट या मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक व प्रचार करण्याकरिता ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची अंमलबजावणी लातूर जिल्हयातील सर्व तालुक्यात होत असून अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये 10 डिसेंबर 2023 ते 29 फेब्रुवारी 2024 या कालावधीत करण्यात येणार आहे. चाकूर तालुक्यात 11 डिसेंबर 2023 ते 11जानेवारी 2024 या कालावधीत चाकूर तालुक्यातील सर्व गावामध्ये ही मोहिम राबविली जाणार आहे.
या मोहिमेत प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी अहमदपूर मतदार संघातील प्रत्येक गावात एक मोबाईल व्हॅन येणार आहे. या व्हॅनसोबत एक नोडल अधिकारी असणार आहे. या व्हॅनमध्ये ऑडियो-व्हिडिओ सुविधा असून मास्टर ट्रेनर ई. व्ही. एम. व व्ही. व्ही. पॅटद्वारे प्रत्यक्ष मतदान कसे करावे याचे प्रात्यक्षिक करून दाखविणार आहेत.
अहमदपूर विधानसभा मतदार संघातील सर्व नागरीकांनी या मोहीमेत सहभागी व्हावे व जास्तीत जास्त सहभाग नोंदवुन प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे, निवडणुक विभागाच्या उपजिल्हाधिकारी सुचिता शिंदे, अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा अहमदपूरचे उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, चाकूरचे तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांनी केले आहे.
या मोहिमेचा तहसील कार्यालयाच्या परिसरात तहसीलदार रेणुकादास देवणीकर यांच्या हस्ते ई. व्ही. एम. व व्ही. व्ही. पॅट या मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक मोबाईल व्हॅनला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.यावेळी नायब तहसीलदार दिगंबर स्वामी यांच्यासह महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??