चाकूर पोलीसांनी 24 तासात 46 हजारांच्या मुद्देमालासह मोबाईल चोरास केली अटक
चाकूर : 23 फेब्रुवारी / मधुकर कांबळे
चाकूर तालुक्यातील आष्टामोड येथील शांताई हॉटेल वरून मोबाईल घेऊन पळ काढणाऱ्या आरोपीस अवघ्या 24 तासात चाकूर पोलीसांनी अटक करून त्यांच्याकडून 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की तालुक्यातील आष्टामोड येथील शांताई हॉटेल वरून दि.16 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास हॉटेल चालक सुनिल शिवाजीराव ठाकुर यांनी शांताई हॉटेलमध्ये त्यांच्या मोबाईलची चार्जिंग संपल्यामुळे मोबाईल चार्जिंगला लावलेला होता.त्याचवेळी शरद अर्जुने रा. गांजूर हा इसम हॉटेलच्या खुर्चीवर येऊन बसला.ठाकूर हे मोबाईल चार्जीगला लावून काउंटरवर ठेवून गिऱ्हाईक करीत असताना चार्जीगला लावलेला काउंटरवरचा मोबाईल शरद अर्जुने हा घेवून पळून जात आहे असे हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसलेले ग्राहक संदीपान गुरमे यांनी ठाकूर यांना सांगीतले.त्यामुळे हॉटेल चालक ठाकूर व अन्य हॉटेलमध्ये असणाऱ्या दोघांनी अर्जुने यांना पकडण्यासाठी पाठलाग केला मात्र ज्वारीच्या पिकात अर्जुने घूसल्याने तो सापडला नाही.त्यामुळे सुनिल ठाकुर यांनी चाकूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. त्यानुसार चाकूर पोलीस स्टेशन मध्ये गु.र.न.- 68/2024 कलम 379 भादवी मधील नमूद आरोपीविरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला. व अवघ्या 24 तासाच्या आत पोलीसांनी शरद राजेंद्र अर्जुने (वय वर्ष 32) यांना पकडून त्यांच्याकडून ओपो एफ, 21 एस. प्रो. कंपनीचा मोबाईल किंमत 20,000 रु, ओपो सी.पी.एच. 2477 कंपनीचा मोबाईल किंमत 18,000 रु., व एक तोशीबा कंपनीची एल.ए.डी. टिव्ही किंमत 8,000 रु.असा एकूण 46,000 रुपयाचा मुददेमाल जप्त करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेश घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली बी. बी. मामडगे हे करीत आहेत.