चाकूरात 827 कर्मचाऱ्यांनी घेतले जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे प्रशिक्षण

चाकूर : 26 जानेवारी (मधुकर कांबळे )
चाकूर येथील यशवंत मंगल कार्यालयात जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी शनिवार दिनांक 24 जानेवारी 2026 रोजी तालुक्यातील कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात उपजिल्हाधिकारी तथा चाकूरच्या निवडणूक निर्णय अधिकारी संगीता टकले व तहसीलदार नरसिंग जाधव यांनी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले.यात चाकूर तालुक्यातील 827 कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले.
उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी संगीता टकले यांनी निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती सांगून निवडणुकीसाठी मतदान केंद्रावरील देण्यात येणाऱ्या विविध सुविधाची माहिती दिली. चाकूर तालुक्यात जिल्हा परिषदेचे पाच विभाग (गट )व पंचायत समितीचे 10 गण असून यासाठी तालुक्यात 151 मतदान केंद्र आहेत. तालुक्यात एकूण एक लाख 36 हजार 272 मतदार असून 71 हजार 457 पुरुष, 64 हजार 814 महिला तर 1731 दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी दहा क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून निवडणुकीचे कार्य हे देशसेवेचे वृत्त म्हणून करावे तसेच हे काम काटेकोरपणे व सचोटीने करावे असे संगीता टकले म्हणाल्या.
तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी नरसिंग जाधव यांनी मतदान यंत्राची सविस्तर माहिती सांगून मतदान यंत्राची जोडणी कशी करावी तसेच यावेळी झालेल्या नवीन बदलाची माहिती दिली. जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी मतदान यंत्रावरील पत्रिकेबाबतचीही माहिती दिली. या निवडणुकीत शाई ऐवजी मार्कर पेनचा वापर केला जाणार असून प्रत्यक्ष मतदानापूर्वी घेण्यात येणारा मॉकपोल अतिशय काळजीपूर्वक घ्यावा असे सांगून मतदान केंद्राची रचना कशी करावी व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी काय दक्षता घ्यावी याची सविस्तर माहिती तहसीलदार जाधव यांनी दिली.यावेळी निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार शैलेश निकम उपस्थित होते.
सदर प्रशिक्षणासाठी 850 कर्मचारी यांना आदेश पाठवण्यात आले होते. मात्र 850 पैकी 23 कर्मचारी गैरहजर होते .या गैरहजर कर्मचारी यांना नोटीस पाठविण्यात येणार आहे.
=================
नरसिंग जाधव
तहसीलदार तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चाकूर


