लोकसभेचे माजी अध्यक्ष शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवरांनी घेतले अंत्यदर्शन

लातूर : दि. 13 डिसेंबर (मधुकर कांबळे )
राज्यात व केंद्रात जवळपास सहा दशके आपल्या सुसंस्कृत राजकारणाने जनसेवा करणारे राजकारणातील ऋषितुल्य व्यक्तिमत्व असणारे लातूर जिल्ह्याचे व चाकूर भूमीचे सुपुत्र तथा लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी केंद्रीय गृह मंत्री, पंजाब राज्याचे माजी राज्यपाल शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवावर शनिवार दि.13 डिसेंबर 2025 रोजी लातूर तालुक्यातील वरवंटी येथे शासकीय इतमामात व धार्मिक मंत्रोच्चारात अंत्यसंस्कार करण्यात आले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी पुष्पचक्र अर्पण करून चाकूरकर यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच पोलीस दलाच्या जवानांनी यावेळी बंदुकीच्या फैरींची सलामी देऊन चाकूरकरांना मानवंदना दिली.
शुक्रवार दि.12 डिसेंबर 2025 रोजी चाकूरकर यांचे लातूर येथील देवघर या निवासस्थानी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले.त्यांच्या पार्थिवावर शनिवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.अंत्यविधी अगोदर सकाळी देवघर निवासस्थानी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या पार्थिवाला पोलीस दलातर्फे मानवंदना दिल्यानंतर अंत्ययात्रेला सुरुवात झाली. फुलांनी सजविलेल्या रथातून त्यांचे पार्थिव औसा रोड, छत्रपती शिवाजी महाराज चौक, पीव्हीआर चौकमार्गे वरवंटी येथे चाकूरकर कुटुंबियांच्या शेतामध्ये आणण्यात आले. याठिकाणी शोकाकुल जनसमुदायाच्या उपस्थितीत चाकूरकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शिवराज पाटील चाकूरकर यांचे पुत्र शैलेश पाटील चाकूरकर, स्नुषा डॉ. अर्चना पाटील चाकूरकर यांच्यासह कुटुंबियांचे सांत्वन केले.
यावेळी कर्नाटक राज्याचे वनमंत्री ईश्वर खंड्रे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, खा. डॉ. भागवत कराड, खा.रजनी पाटील, खा. डॉ. अजित गोपछडे, खा. डॉ. शिवाजी काळगे, आ. अमित देशमुख, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. संजय बनसोडे, आ.अभिमन्यू पवार, माजी केंद्रीय मंत्री भगवंत खुबा, माजी खासदार चंद्रकांत खैरे, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पंजाब पोलीस दलाचे उपमहानिरीक्षक इंदरवर सिंग, लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, मुंबई उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश नरेश पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही यावेळी चाकूरकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
शिवराज पाटील चाकूरकर यांनी आपल्या सहा दशकांच्या राजकीय, सामाजिक जीवनात प्रामाणिकपणे देशाची सेवा केली. लोकसभेचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी लोकशाहीचे मंदिर असलेल्या संसदेची प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी भरीव योगदान दिले, संसदीय परंपरेला नवा आयाम दिला. संसदीय समित्यांसाठी त्यांनी पुढाकार घेतला. राजकारणातील त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील, अशा शब्दात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भावना व्यक्त केल्या.तसेच केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ,राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे,कर्नाटक राज्याचे वनमंत्री ईश्वर खंड्रे ,माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण माजी मंत्री दिलीपराव देशमुखआमदार संभाजी पाटील निलंगेकर,माजी खासदार चंद्रकांत खैरे,माजी मंत्री बसवराज पाटील यांनी श्रद्धांजली अर्पण करून चाकूरकर यांच्या आठवणी सांगून त्यांच्या कार्याला उजाळा दिला.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकूरकरांचे लातूर येथील देवघर येथे जाऊन अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली.
अंत्यविधी साठी राज्य कृषीमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, कर्नाटकचे आमदार बी. आर. पाटील, महाराष्ट्राचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, माजी खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी खासदार सुधाकर शृंगारे, माजी आमदार शिवाजी पाटील कव्हेकर, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार धीरज देशमुख यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


