आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पत्रकारांची लेखणी ही तलवारीपेक्षा अधिक धारदार असते – सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन
शानदार कार्यक्रमात मराठवाडास्तरीय पत्रकारीता पुरस्काराने जेवरीकर, थोरात, मिरजकर सन्मानित !

- चाकूर : 14 जानेवारी (मधुकर कांबळे ) समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांची भूमिका फार महत्वाची असून खऱ्या अर्थाने पत्रकारांच्या लेखणीतूनच समाजाचे प्रतिबिंब उमटते.पत्रकार हा प्रशासन व लोकप्रतिनिधी यांच्यातील दुवा असून पत्रकारांची लेखणी ही तलवारीपेक्षा अधिक धारदार असते असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी केले.

- चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाच्या सभागृहात चाकूर सिटी प्रेस क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ना. पाटील बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सर्जेराव शिंदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष करीमसाहेब गुळवे, उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिपाळे, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, जेष्ठ पत्रकार अनिल वाडकर, कामगार नेते पप्पूभाई शेख उपस्थित होते.

- पुढे बोलताना ना.पाटील म्हणाले की पत्रकारिता ही समाजाला न्याय देण्यासाठी असून सामाजिक बांधिलकी समजून पत्रकारिता करणे आवश्यक असते.पुरस्कार छोटा आहे किंवा किती मोठा आहे हे महत्वाचे नसते तर त्या पुरस्काराच्या पाठीमागील भावना महत्वाच्या असतात.सिटी प्रेस क्लब चाकूरने पुरस्कारासाठी अत्यंत योग्य पत्रकारांची निवड केली आहे.अशाच पद्धतीने त्यांनी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांनाही सन्मानित करावे अशी अपेक्षा ना.पाटील यांनी व्यक्त केली.
या शानदार समारंभात ना. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते जेष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांना स्व.नागोराव संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ पत्रकार अ. ना.शिंदे यांच्यावतीने ‘राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार’,मुंबई येथील जनसंपर्क विभागातील वरिष्ठ सहाय्यक संचालक काशीबाई थोरात यांना स्व.काशीबाई बळीराम सोनटक्के यांच्या स्मरणार्थ जेष्ठ स्वातंत्र सैनिक बळीरामजी सोनटक्के व पत्रकार संगमेश्वर जनगावे यांच्यावतीने ‘राज्यस्तरीय पत्रकार भूषण पुरस्कार’ तर दैनिक सामनाचे लातूर जिल्हा प्रतिनिधी अभय मिरजकर यांना कालवश मालनबाई सोपानराव कांबळे व कालवश सोपान काशीराम कांबळे यांच्या स्मरणार्थ पत्रकार मधुकर कांबळे यांच्या वतीने ‘राज्यस्तरीय मायदादा वृत्तरत्न पुरस्कार’ देऊन सन्मानीत करण्यात आले.
याप्रसंगी पुरस्कार प्राप्त सन्मानार्थी पत्रकार संजय जेवरीकर, काशीबाई थोरात, अभय मिरजकर यांनी सत्काराला देत यथोचीत मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.सर्जेराव शिंदे यांनी केला.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात या पुरस्काराची भूमिका सिटी प्रेस क्लबचे सचिव मधुकर कांबळे यांनी विशद केली.अध्यक्ष प्रा. अ. ना. शिंदे यांनी पुरस्कार प्राप्त सन्मानार्थी यांच्या कार्याच्या आढावा घेत परिचय करून दिला. दरम्यान कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ,युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद आणि दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमास व्ही. एस. पँथर्सचे जिल्हाध्यक्ष शरद किनीकर,दशरथ अर्बन बँकेचे चेअरमन दिलीप पाटील, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष संदीप शेटे,प्रा. डॉ. बी. डी. पवार यांच्यासह विविध वर्तमान पत्राचे प्रतिनिधी, प्राध्यापक,तसेच अनेक महिला व नागरिक यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पत्रकार संगमेश्वर जनगावे, सतीश गाडेकर,सलीम तांबोळी, सुनील भोसले, के. आर. वाघमारे, विजय शिंदे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सिटी प्रेस क्लबचे सल्लागार प्रा. डॉ.राजेश तगडपल्लेवार यांनी केले तर आभारप्रदर्शन सलीम तांबोळी यांनी मानले.



