ना. बाबासाहेब पाटील यांनी तेलगावच्या जिल्हा परिषद शाळा प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचे केले स्वागत

चाकूर :15 जून (मधुकर कांबळे )
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तेलगाव येथे भेट देऊन विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
शिक्षण हे व्यक्तिमत्त्व विकासाचे प्रभावी माध्यम असून विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी शासन विविध उपक्रम राबवत आहे असे सांगून ना. पाटील यांनी यावेळी शाळेतील शैक्षणिक वातावरण, उपलब्ध सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली. शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांसाठी आनंददायी, प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरावा या उद्देशाने विद्यार्थ्यांशी संवाद साधत ना. पाटील यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांना नव्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी अहमदपूरचे गटविकास अधिकारी पंकज शेळके, गटशिक्षणाधिकारी रामलिंग काळे, केंद्रप्रमुख ज्ञानेश्वर तोडकर, मुख्याध्यापक राजू बडगिरे, ग्रामसेवक प्रशांत घुगे, उपसरपंच पंढरीनाथ जाधव, चेअरमन दिनकर जाधव, बालाजी बेंबडे, रामराव खिडसे, देवानंद जाधव तसेच शाळेतील विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


