अहमदपूर चाकूर विधानसभेचे आमदार बाबासाहेब पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागणार
मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा

चाकूर : 11 डिसेंबर /मधुकर कांबळे
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघांचे आमदार बाबासाहेब पाटील यांची राज्य मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री म्हणून वर्णी लागणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात असून यासाठी आमदार पाटील यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुंबई गाठून राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यावर भर दिला आहे.या भेटीगाठीत वरिष्ठ नेत्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्यामुळे चाकूर अहमदपूर मतदार संघाला मंत्रिपद मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
अतिशय अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत आ. बाबासाहेब पाटील यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करीत सलग दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला असून त्यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार माजीमंत्री विनायकराव पाटील व जनसुराज्य पक्षाचे उमेदवार गणेश हाके यांचा पराभव केला आहे. यापूर्वी 2009 मध्ये बाबासाहेब पाटील यांनी रिडालोसच्या माध्यमातून पहिल्यांदा चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघांचे आमदार म्हणून विधान सभेमध्ये पाच वर्षे काम केले आहे.मागील दहा वर्षाचा आमदार म्हणून कामाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे व पुन्हा एकदा आमदार झाल्यामुळे आ.बाबासाहेब पाटील यांची निश्चितच मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री म्हणून वर्णी लागणार असे राजकीय क्षेत्रातील जाणकार मंडळीतून बोलले जात आहे.
आ.पाटील यांनी लातूर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष पद,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद भूषविले असून त्यांनी राज्य पणन महासंघांचे अध्यक्षपदही यशस्वीरित्या सांभाळले आहे. त्याचबरोबर कारखाना,बँका,शैक्षणिक संस्था चालविण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे.तसेच आ.बाबासाहेब पाटील हे अजितदादा पवार यांचे अत्यंत निकटवर्ती व विश्वासू आमदार म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच मागील पाच वर्षात करोडो रुपयांचा विकास निधी आणून चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचे काम केले आहे.त्यामुळे अजितदादा पवार यांच्याकडून आ.बाबासाहेब पाटील यांना मंत्रिमंडळात मंत्री म्हणून स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे.
आमदार पाटील यांना मंत्रिपद मिळावे म्हणून चाकूर वअहमदपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुंबई येथे जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे यांची भेट घेऊन आ. पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी विनंती केली आहे. पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाना पवार व तटकरे यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे बोलले जात आहे.
आ.बाबासाहेब पाटील यांनी 1985 नंतर सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा इतिहास रचला
अतिशय अटीतटीच्या तिरंगी झालेल्या निवडणुकीत विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे उमेदवार माजीमंत्री विनायकराव पाटील व जनसुराज्य पक्षाचे उमेदवार गणेश हाके यांच्यावर मात करीत 31 हजार 685 एवढ्या मोठ्या फरकाने विजयश्री खेचून आणली आहे.त्यातच शेकापचे स्व.भाई किशनराव देशमुख यांच्यानंतर म्हणजेच 1985 नंतर सलग दोन वेळा आमदार होण्याचा मानही आमदार पाटील यांना मिळाला आहे.आ. पाटील हे या मतदार संघांचे तीन वेळा प्रतिनिधीत्व करीत असल्यामुळे निश्चितच या आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आ. पाटील यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.तूर्ततरी प्रतीक्षा आहे मंत्रिमंडळ विस्ताराची !


