महाराष्ट्र सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर प्रश्नासाठी सदैव तत्पर – सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील

चाकूर : 2 सप्टेंबर (मधुकर कांबळे )
मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या संदर्भात महाराष्ट्र सरकारने सकारात्मक निर्णय घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेल्या जवळपास मागण्या मान्य केल्या असून त्या संदर्भातला शासन आदेश सरकारने काढला आहे. यापुढेही महाराष्ट्र सरकार मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर प्रश्नासाठी सदैव तत्पर असेल अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी उपोषण सोडल्यानंतर मराठा उपसमितीचे सदस्य तथा राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी प्रसार माध्यमाशी दिली.
या संदर्भात प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना ना. बाबासाहेब पाटील म्हणाले की,मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नासह इतर प्रश्नाच्या संदर्भात सरकार कटिबद्ध असून, मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका ही योग्य होती. आरक्षण देणे काळाची गरज होती. त्यासाठी सर्व विधिमंडळ सकारात्मक होतं. कायद्याच्या चौकटीत बसून मराठा समाजाला आरक्षण देणे गरजेचे होतं. यामध्ये निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीची भूमिका सुद्धा महत्त्वाची ठरली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री अजित पवार,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठा उपसमितीचा सदस्य म्हणून मला काम करता आलं व मराठा समाजाच्या आरक्षणात मलाही खारीचा वाटा उचलता आला याचा मला अभिमान व आनंद असल्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील म्हणाले.
मराठा समाजाने सुद्धा अत्यंत संयमाने आंदोलन केलं. मराठा समाजाच्या आरक्षणाचा विजय झाल्याबद्दल सर्व मराठा समाजाचे मनापासून अभिनंदन करतो असेही ना. पाटील म्हणाले. सर्व मराठा समाजाच्या नागरिकांनी आता सर्व कागदपत्रे प्रशासकीय यंत्रणेकडे जमा करून या आरक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.


