तिर्थवाडी ते चाकूर ग्रामीण रस्त्याच्या कामासाठी अडीच कोटी रुपये निधीची आ.बाबासाहेब पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांची मागणी

चाकूर : 12 डिसेंबर /मधुकर कांबळे
तिर्थवाडी ते चाकूर ग्रामीण मार्ग 103 या रस्ता कामासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर करून द्यावा अशी मागणी चाकूर अहमदपूर तालुक्याचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्याकडे या भागातील शेतकऱ्यांनी एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
आ. पाटील यांना दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की , तीर्थवाडी चाकूर ग्रामीण रस्ता हा शेतकऱ्यांच्या वाहतुकीसाठी महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या भोवतालच्या किमान शंभर शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी व शेतातील माल घेऊन येण्यासाठी या रस्त्याव्यक्तिरिक्त कसल्याही प्रकारचा इतर दुसरा रस्ता नाही. हा रस्ता झाल्याशिवाय शेतकऱ्यांची सोय होणार नाही. याशिवाय तिर्थवाडी व मांडूरकी या गावांच्या नागरिकांना चाकूर या तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी हा रस्ता तयार झाला तर पाच किलो मिटर अंतर कमी होणार आहे व आजूबाजूच्या शेतकऱ्यांची फार मोठी सोय होणार आहे.म्हणून या मार्गासाठी अडीच कोटी रुपये निधी मंजूर करून देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.या निवेदनावर विलासराव पाटील,मोहनराव पाटील,मन्मथ सगरे,संजय पाटील,दिलीप महालिंगे,गजानन पाटील,विलास महालिंगे,पपन कांबळे,गणपत पाटील ,बालाजी महालिंगे,बबनराव पाटील,बालाजी सांळूके,शिवप्रसाद शेटे,वंसत पाटील,अभिजीत जाधव आदीच्या स्वाक्षऱ्या आहेत.


