बारावी परीक्षेत भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाच्या निकालाची उज्ज्वल परंपरा कायम
परीक्षा मंडळाकडून केंद्रावर बाह्य केंद्र संचालक व पर्यवेक्षकांची केली होती नियुक्ती

चाकूर : 5 मे / मधुकर कांबळे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल सोमवार दि.5 मे 2025 रोजी जाहीर झाला असून यंदा चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत महाविद्यालयाच्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.महाविद्यालयाचा एकूण निकाल 89.01 टक्के लागला आहे.
येथील भाई किशनराव देशमुख महाविलायात कला, वाणिज्य व विज्ञान या शाखा असून यावर्षी 255 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.यात कला शाखातील 65 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यात 51 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.वाणिज्य शाखातील 70 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली त्यात 58 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर विज्ञान शाखातील 120 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.त्यापैकी 118 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
कला शाखेचा शेकडा निकाल 79 टक्के लागला असून कु. मयुरी नागनाथ होनमाने ही 71.33 टक्के गुण मिळवीत कला शाखेत प्रथम आली आहे.वाणिज्य विभागाचा शेकडा निकाल 83 टक्के असून कु.अपर्णा बालाजी होटे हिने 84.17 टक्के गुण घेत वाणिज्य शाखेत व महाविद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे.तर विज्ञान शाखेचा शेकडा निकाल 99 टक्के लागला असून कु. जिजाऊ विठ्ठल डिगोळे हिने 75.83 टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आली आहे. कु. मुस्कान जलील शेख या विद्यार्थिनीने शिक्षणशात्र विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले आहेत.विशेष म्हणजे प्रतीक निलेश लवटे याच्या वडिलांचे बारावी प्रात्यक्षिक परीक्षेत दुःखद निधन झाले असताना सुद्धा प्रतीक परीक्षा देऊन उत्तीर्ण झाला आहे.
या यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेच्या अध्यक्षा सीमा देशमुख, सचिव ॲड. पी. डी. कदम, उपाध्यक्ष आबासाहेब देशमुख, सहसचिव बाबासाहेब देशमुख, प्राचार्य डॉ.सर्जेराव शिंदे, पर्यवेक्षक प्रा. बाळासाहेब बचाटे, सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले आहे .
विशेष म्हणजे यावर्षी परीक्षा मंडळाने चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर बाह्य केंद्र संचालक व पर्यवेक्षक नियुक्त केले होते. त्यात चापोली येथील संजीवनी महाविद्यालचे केंद्र संचालक व तेथीलच सर्व पर्यवेक्षक यांची नियुक्ती केली होती.


