पत्रकार प्रशांत शेटे राज्य शासनाच्या वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्काराने सन्मानित
राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक शेटे यांचा सत्कार

चाकूर : 29 सप्टेंबर /मधुकर कांबळे
येथील दैनिक सकाळचे तालुका प्रतिनिधी पत्रकार प्रशांत शेटे यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणारा वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार आज रविवार दि.29 सप्टेंबर 2024 रोजी मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम वरळी येथे राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे, शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्यासह कृषी विभागाचे संचालक, आयुक्त यांच्या सह कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.हा मानाचा शासकीय पुरस्कार मिळाल्याबद्दल शेटे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
चाकूर येथील दैनिक सकाळचे पत्रकार प्रशांत शेटे यांनी शेतीविषयक त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या विविध यशोगाथा व कृषी विभागाच्या विविध योजनेची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी माध्यम म्हणून योग्य भूमिका बजावल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र शासनाच्यावतीने कृषी मित्र पुरस्कार फेब्रुवारी 2024 मध्ये जाहिर झाला होता.या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम एक लाख 25 हजार रुपये , सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे असून आज रविवार दि.29 सप्टेंबर रोजी मुंबई येथे एका विशेष कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील, भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे यांच्या सह चाकूरतील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवराकडून व रोटरी तसेच तालुक्यातील सर्व पत्रकार संघटनेकडून अभिनंदन होत आहे.


