अहमदपूरात बाजी कोण मारणार ? निकालाची उत्सुकता शिगेला
तिरंगी लढतीने चुरस वाढली, मतदानाचा टक्काही वाढला

चाकूर : 22 नोव्हेंबर /मधुकर कांबळे
अहमदपूर विधानसभा मतदार संघात महायु्तीकडून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील, महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील आणि जनसुराज्य पार्टीचे उमेदवार गणेश हाके यांच्यात अटीतटीची तिरंगी लढत होत असून उद्या निकालात कोण बाजी मारणार ? व विजयाचा गुलाल कोण उधळणार ? याची उत्सुकता शिगेला पोहचली असून प्रत्येक उमेदवाराचे समर्थक आम्हालाच गुलाल लागणार असे दावे करीत आहेत. मात्र अपक्ष आणि बंडखोरामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या उमेदवारांची व कार्यकर्त्यांचीही धाकधूक वाढलेली पहावयास मिळत आहे.
अहमदपूर विधानसभा मतदारसंघात प्रचारात शेवटच्या टप्यात चांगलीच रंगत भरली होती.आमदार बाबासाहेब पाटील यांनी 17 नोव्हेंबर रोजी चाकूरच्या सोसायटी चौकात विराट जाहीर सभा घेऊन चांगलीच हवा निर्माण केली. तर माजीमंत्री विनायकराव पाटील यांच्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व फौजीया खान यांनी तर गणेश हाके यांच्या प्रचारासाठी जन सुराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे व ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी तर अपक्ष उमेदवार बालाजी पाटील चाकूरकर यांनीही मस्जिद चौकात सभा घेऊन प्रचारात चांगलीच रंगत आणली.या झालेल्या जाहीर सभेच्या मंचावरुन एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैऱ्या झाडल्या गेल्या.
विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनी 2009 व 2019 मध्ये दोनवेळा आमदार म्हणून विजय मिळविला असून विनायकराव पाटील यांना 1999 व 2014 मध्ये आमदार होण्याची संधी मिळाली आहे. तसेच गणेश हाके यांनीही 2014 मध्ये आमदार होण्यासाठी नशीब आजमावले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही.पुन्हा एकदा आजी माजी आमदार व हाके हे आमनेसामने निवडणूकीच्या रिंगणात उतरले असून मतदार राजा आशीर्वाद नेमका कोणाला देणार हे उद्याच स्पष्ट होणार असून त्यामुळे उद्याच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
अहमदपूर विधानसभा मतदार संघात अहमदपूर आणि चाकूर या दोन तालुक्याचा समावेश असून मतदार संघात एकूण 3 लाख 48 हजार 743 मतदार आहेत.यापैकी 2 लाख 39 हजार 625 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यात एक लाख 25 हजार 738 पुरुष, एक लाख 13 हजार 886 महिला व अन्य एकानी मतदानाचा हक्क बजावला आहे.मागील निवडणूकीच्या तुलनेत मतदार आणि मतदानाचा टक्का वाढला असून वाढलेला टक्का कोणाकडे जाणार यावरही बराचसा निकालावर परिणाम होणार असल्याचे राजकीय जाणकार बोलत आहेत.


