जागतिक महिला दिनी चाकूरच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी सांभाळला संपूर्ण पोलीस ठाण्याचा कारभार
पोलीस ठाण्याच्यावतीने विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार,पोलीस निरीक्षक बबिता वाकडकर यांनी राबविला स्तुत्य उपक्रम

चाकूर : 9 मार्च / मधुकर कांबळे
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चाकूर पोलीस ठाण्याचा संपूर्ण कारभार येथील महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळला असून यामुळे त्या सर्व महिला कर्मचाऱ्यांचे अभिनंदन व कौतुक हा उपक्रम राबविणाऱ्या पोलीस निरीक्षक बबिता वाकडकर यांनी केले.त्याचबरोबर शहरातील विविध क्षेत्रातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ठाण्याच्यावतीने सत्कार करण्यात आला.
शनिवार दि.8 मार्च रोजी जागतिक महिला दिन जगभरात विविध उपक्रमानी साजरा करण्यात आला. चाकूर येथेही या दिनानिमित्त पोलीस ठाण्यातील विविध पदावर काम करणाऱ्या आठ महिला कर्मचाऱ्यांनी संपूर्ण ठाण्याची जिम्मेदारी स्विकारून अतिशय चांगल्या पद्धतीने आपापली जबाबदारी उत्साहाने, कर्तबगारिने व यशस्वीपणे निभावली. या दिनी पोलीस ठाण्याच्या सर्वच जबाबदाऱ्या पोलीस निरीक्षक वाकडकर यांनी ठाण्यातील कार्यरत असलेल्या आठ महिला अंमलदारांकडे दिली होती . ही जबाबदारी सर्व महिला अंमलदारांनी पार पाडीत हम भी कुच्छ कम नही हे दाखवून दिले.
याच दिनी पोलीस ठाण्याच्यावतीने सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमांतर्गत चाकूर शहरातील विविध क्षेत्रात व विविध पदावर काम करणाऱ्या प्रतिष्ठित महिलांचा पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस निरीक्षक बबिता वाकडकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.यावेळी चाकूर न्यायालयातील सरकारी वकील ॲड. पुनम भराडिया, ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रियंका वाडेकर,शासकीय मुलीच्या वसतिगृहाच्या गृहपाल वर्षा चौधरी, डॉ. शुभांगी कोरे, डॉ. अनुपमा हुडगे, डॉ. शुभांगी हाके, संगीता गोलावर आदिची प्रमुख उपस्थिती होती. याही सर्व मान्यवर महिलांचा सन्मान करण्यात आला.त्याचबरोबर पोलीस ठाण्याच्या सर्व महिला, त्यांचे कुटुंबीय व पोलीसवस्तीमधील सर्व महिला यांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी वाकडकर यांनी उपस्थित महिलांशी संवाद साधून आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी गडदे यांनी केले.या कार्यक्रमास पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
यांनी सांभाळला पोलीस ठाण्याचा कारभार
====================
सुरेखा हाके, द्वारका श्रीमंगले, श्रीदेवी पटवेकर, अश्विनी गडदे, पार्वती धोंडापुरे,उषा कोटे, योगेश्वरी कच्छवे व वर्षा गायकवाड


