माणसाला पैश्यामुळे नव्हे तर ज्ञानामुळे मान मिळतो- सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील
कबनसांगवी येथे 64 गुणवंतांचा सत्कार,माजी मंत्री आ.संजय बनसोडे, अर्चना पाटील चाकूरकर यांची उपस्थिती.

चाकूर : 11 नोव्हेंबर (मधुकर कांबळे )
जेव्हा गुणवत्तेचा कस लागतो तेव्हा संपत्तीपेक्षा ज्ञानाचे पारडे अधिक जड असते. त्यामुळे जगात माणसाला पैश्यामुळे नव्हे तर ज्ञानामुळे मान मिळतो.असे मौलिक प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी केले.
तालुक्यातील कबनसांगवी येथे रविवार दि.9 नोव्हेंबर रोजी गावचा अभिमान.. गुणवंतांचा सन्मान या कार्यक्रमात ते बोलत होते.केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलिस पाटील माणिकराव पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री आ.संजय बनसोडे,भाजपा नेत्या डाॅ. अर्चना पाटील चाकूरकर, माजी जि.प.सदस्य सुदर्शन मुंढे,माजी नगराध्यक्षा उषा कांबळे, नगरसेवक नितीन रेड्डी,माजी नगरसेवक रविंद्र निळकंठ,सरपंच अनुश्री सांगवे,उपसरपंच मीनाक्षी राजारुपे,विनायक बडे आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील म्हणाले की,पालकांनी संपत्तीपेक्षा संततीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी अधिकाधिक ज्ञान मिळविले पाहिजे. कारण जगात ज्ञानाला मान आहे. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर होय. त्यांच्याकडे संपत्ती नव्हती मात्र ‘ज्ञानाचे प्रतीक’ म्हणून आज त्यांचे नाव जगात सर्वत्र गाजत आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी इतर काही कामे थांबवली आहेत. परंतु येत्या काही महिन्यांत येरोळमोड ते चाकूर रस्त्याचे काम पूर्ण करु अशी ग्वाही ना. पाटील यांनी दिली.
माजी पंचायत समिती सदस्य राजकुमार राजारुपे यांच्या संकल्पनेतुन ॲड.विनोद निला,धनराज बाचिफळे यांनी ‘गावचा अभिमान.. गुणवंतांचा सन्मान’ या बॅनरखाली आयोजित केलेल्या या सत्कार सोहळ्यात नवीन 23 डॉक्टरांचा व 9 वैद्यकिय प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व दहावी,बारावी व विविध शिष्यवृत्ती परीक्षेत व खेळात प्राविण्य मिळवलेल्या तसेच शासकिय नोकरीस असलेल्या एकूण 64 जणांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी मंत्री आ.संजय बनसोडे,डाॅ.अर्चना पाटील चाकूरकर यांनी गुणवंतांना शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमात ना. पाटील व आ. बनसोडे यांचा ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजकुमार राजारुपे यांनी केले. सुत्रसंचालन धनराज बाचिफळे व प्रमोद हुडगे यांनी केले तर आभार ॲड . विनोद निला यांनी मानले.यावेळी चेअरमन संजय पाटील, पोलीस पाटील सोपानदेव पाटील,महात्मा गांधी तंटामुक्त गाव समीतीचे अध्यक्ष शिवाजी नांगराळे,डाॅ.महादेव सुर्यवंशी,ज्ञानेश्वर सांगवे,अनिल नागराळे,संतोष राजारुपे,संजय राजारुपे,ओम सांगवे,रतन सोनकांबळे,शरद निला,रमाकांत मोतीपवळे,गंगाधर मोतीपवळे,अक्षय मोतीपवळे यांच्यासह गावातील नागरीक,महिला मोठया संख्येने उपस्थीत होते.
==================
कबनसांगवी गुणवत्तेची खाण – माजी मंत्री बनसोडे
==================
कबनसांगवी येथील विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शिक्षणाचा विचार खऱ्या अर्थाने जोपासला असून कबनसांगवी हे गाव गुणवत्तेची खाण असल्याचे गौरोदगार माजी मंत्री आ. संजय बनसोडे यांनी काढले.
===================
कबनसांगवी सर्वच क्षेत्रात गुणवत्तेत अव्वल -डाॅ.चाकूरकर
====================
कबनसांगवी गावातील विद्यार्थी सर्वच क्षेत्रात गुणवत्तेत अव्वल आहेत हे कौतुकास्पद आहे असे भाजपा नेत्या डाॅ.अर्चना पाटील चाकूरकर म्हणाल्या.



