आजी- आजोबा मुला मुलींच्या जीवनातील चालते बोलते विद्यापीठ – प्रा.श्रीहरी वेदपाठक यांचे प्रतिपादन

चाकूर : 6 ऑक्टोबर /मधुकर कांबळे
भारतीय संस्कृतीमध्ये पाश्चिमात्तिकरणामुळे आज कुटुंब संस्था खालावलेली असून कुटूंब विभक्तीकरणाकडे वाटचाल चालू झालेली आहे. खरे संस्काराचे केंद्र हे आजी-आजोबाच असून प्रत्येक कुटुंबातील आजी आजोबा हे मुलामुलींच्या जीवनातील चालते बोलते विद्यापीठच असल्याचे आग्रही प्रतिपादन संजीवनी महाविद्यालय चापोलीचे सेवानिवृत्त प्रा.श्रीहरी वेदपाठक यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्ताने अहमदपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयामध्ये ज्येष्ठ मराठी साहित्यिक ग.दि. माडगूळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आजी आजोबा मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गणेश शिक्षण संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड.मानसी हाके होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी सभापती पुष्पा घोटे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष ओम पुणे, पर्यवेक्षक राम तत्तापुरे, माजी सरपंच दामोदर कांबळे, गुंडप्पा तत्तापूरे, शिवाजी गोरे, इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा विजया भुसारे, संग्राम साबणे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना प्रा.वेदपाठक म्हणाले की, आज कुटूंबामध्ये पैसा आहे पण दोन गोष्टींची कमतरता आहे. त्यामध्ये शांती आणि समाधान नाही.आजी- आजोबांनी आपले शरीर साथ देईल तोपर्यंत काम करत रहावे.कुटूंबात,व्यवसायात मुलाला,सुनबाईला साथ दिली पाहिजे. 82 वर्षांचे अभिनेते अमिताभ बच्चन आजही निरंतरपणे काम करतात. त्यामुळे घरातील ज्येष्ठ मंडळींनी आपापल्या कामांमध्ये व्यस्त राहावे. घरातील माणसांना समजून घ्यावे.मनाचा मोठेपणा दाखवावा असे जाहीर आवाहन केले. नातं किंवा नातू यावर सर्वप्रथम अधिकार मुलगा व सुनेचा आणि मुलगी व जावयाचा आहे.तेथे आपला अधिकार गाजवू नका,त्यामुळे वादविवाद वाढतील.आपल्या मुलाचे,सुनबाईचे कौतुक करा,त्यांना प्रोत्साहन द्या,घरा त सकारात्मक वातावरण तयार करा.आपल्या घरात प्रसन्नता, खेळकरपणा निर्माण करा.दु:ख,अपमानाचे प्रसंग उगाळत बसू नका.आपला वर्तमानकाळ आनंदी बनवण्याचे आवाहन केले.
यावेळी राम तत्तापूरे यांचे मनोगत पर भाषण झाले. मेळाव्याचा अध्यक्षीय समारोप ॲड.मानसी हाके यांच्या भाषणाने झाला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मीना तोवर यांनी केले सूत्रसंचालन सतीश साबणे यांनी आभार राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार विजेत्या मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी मानले.यावेळी आजी आजोबा यांच्यासाठी विविध प्रकारचे करमणुकीचे आणि आनंद देणारे खेळ घेण्यात आले. यात सर्वप्रथम येणाऱ्या शशिकला हत्ते व गोविंद मोरे सह द्वितीय, तृतीय येणाऱ्या आजी-आजोबांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


