साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच्या अवमान प्रकरणी कार्यकर्त्यांचा तहसील कार्यालयात कारवाईसाठी ठिय्या.

चाकूर : 25 जून (मधुकर कांबळे )
येथील भूमिअभिलेख कार्यालयात साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचा अवमान केल्याप्रकरणी अद्यापही संबंधितावर कसलीच कारवाई करण्यात आलेली नाही.त्यामुळे संतप्त झालेल्या मातंग समाज बांधवानी संबंधित दोषीवर कारवाई करावी या मागणीसाठी सोमवार दि.24 जून रोजी दुपारी तहसीलदार यांच्या दालनात ठिय्या मांडून आपला रोष व्यक्त केला.तसेच लवकरात लवकर दोषीवर कडक कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
चाकूर भूमिअभिलेख कार्यालयाच्या खिडकीला साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा उलटी करुन ठेवल्याचे गुरुवार दि.19 जून 2025 रोजी निदर्शनास आले.हा महापुरुषाच्या प्रतिमेचा अवमान झाला असून समस्त मातंग समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.त्यामुळे उपअधिक्षक भूमिअभिलेख कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर महापुरुषाच्या प्रतिमेचा अवमान केल्याप्रकरणी निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी अन्यथा चाकूर तालुक्यातील मातंग समाजाच्यावतीने तिव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा तहसीलदार यांना त्याचदिवशी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला होता.दरम्यान मातंग समाज बांधवानी चाकूरच्या पोलीस निरीक्षकांना निवेदन देवून यातील दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निवेदन दिले. यावेळी पोलीस निरीक्षकांकडून चौकशी करून कारवाई करण्यात येईल असे सांगितले गेले.मात्र अद्याप पोलीसांकडूनही चौकशी आणि कारवाई केली नसल्यामुळे मातंग समाज बांधवानी मंगळवारी उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन देवून या प्रकरणातील दोषी संबंधित अधिकारी कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करावा अन्यथा चाकूर तालुक्यातील मातंग समाजाच्या भावनेचा उद्रेक होईल असे त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. पाच दिवसाचा कालावधी उलटूनही अद्याप संबंधित दोषीवर कसलीच कारवाई करण्यात आली नसल्याने काल सोमवारी तहसीलदार यांच्या दालनात ठिय्या मांडला.यावेळी सुनिल सौदागर, अविनाश कवडे,रामेश्वर कसबे,नितीन डांगे,कोमेश कसबे,पपन वैरागे,संगमेश्वर कसबे आदीजण उपस्थित होते.
दरम्यान चाकूरचे तहसीलदार यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख यांना पत्र देवून झाल्या प्रकरणी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी असे पत्राद्वारे कळविले आहे.


