आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अखेर हणमंत जवळगा येथील पाणी प्रश्नाचा तिढा सुटला, आत्मदहन आंदोलनाच्या आक्रमक पवित्र्याने प्रशासन खडाडून जागे

चाकूर : 24 मे / मधुकर कांबळे
चाकूर तालुक्यातील हणमंत जवळगा येथील नागरिकांनी पाण्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेत गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात तीन ते चार जणांनी आत्मदहन करण्याचा केलेला प्रयत्न व पंचायत समितीच्या प्रवेश द्वाराजवळ शेकडो आंदोलनकर्त्यांनी केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे प्रशासन खडाडून जागे झाल्याने हनमंत जवळगा येथील पाणी प्रश्नाचा तिढा सुटला आहे.
हणमंतजवळगा गावाला हिंपळनेर येथील साठवण तलावातून पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत आहे. यासाठी लाखों रूपयाचा निधी खर्चुनही योजना सुरु केल्यानंतर हिंपळनेर येथील काही व्यक्तींनी विहीरीवरील मोटारी व पाईपलाईची नासधुस केल्यामुळे पंधरा दिवासापासून गावाचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. याबाबत ग्रामस्थांनी लातूर जिल्हा परिषद, चाकूर पंचायत समितीकडे निवेदन देऊन सदरील व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली होती.रामदास बालने, तुकाराम केंद्रे, विठ्ठल उदगीरे, व्यंकट बेडदे यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.परंतु प्रशासनाकडून याची दखल घेतली गेली नसल्याने आज शुक्रवार दि.24 मे 2024 रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गावाला सुरळीत पाणी मिळावे या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेत चाकूर पंचायत समितीतील गटविकास अधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा काहींनी प्रयत्न केला.मात्र उपस्थित पोलीस अधिकारी यांच्या सतर्कतेमुळे आत्मदाहनाचा प्रयत्न टळला असलातरी पंचायत समितीच्या परिसरात व गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात बराच वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
आंदोलन करण्यासाठी पंचायत समिती समोर शेकडो महिला व पुरुष बांधवानी मोठी गर्दी केली होती.सर्वच गावकरी महिला व पुरुष यांनी पंचायत समितीत घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी सर्व जमाव प्रवेश द्वारावरच अडविला. याठिकाणी आंदोलनकर्त्यांनी पाणी द्या पाणी द्या,आम्हाला आमचे पाणी द्या, अशा घोषणा देत पाणी मिळाल्याशिवाय माघार नाही अशी आक्रमक भूमिका घेत ठिय्या आंदोलन केले. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
हणमंत जवळगा येथील पाणीपुरवठा विहिरीवर हिंपळनेर ग्रामस्थांनी केलेले अतिक्रमण काढून पुन्हा पाईपलाईन किंवा विहिरीचे नुकसान करणार नाहीत आणि जर पुन्हा पाईपलाईनची किंवा मोटारीची नासधुस केली तर त्यावर शासन कठोर कार्यवाही करेल असे आश्वासन देत चाकूरचे तहसीलदार नरसिंग जाधव,गटविकास अधिकारी वैजनाथ लोखंडे,पोलीस अधिकारी यांनी प्रत्यक्ष स्थळाचा पंचनामा करून पाणी पुरवठा करण्यासाठी कार्यवाही सुरु केल्याने हनमंत जवळगा येथील पाणी प्रश्नाचा तिढा सुटला आहे.यावेळी रामदास बालने, तुकाराम केंद्रे, विठ्ठल उदगीरे, व्यंकट बेडदे, विजय राजुरे दत्ता राजुरे अबासाब जलदे, परमेश्वर झटाळे नारायण राजुरे ,हणमंत कुमठकर रामचंद्र फड, शिवराज बोळेगवे असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. हणमंत जवळगा गावाला आज रात्री उशिरा किंवा उद्यापर्यंत सुरळीत पाणीपुरवठा होईल असे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??