तालुक्यातील सर्व शाळांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाची काटेकोरपणे अमलबजावणी करावी – गटशिक्षणाधिकारी मंदोदरी वाकडे
जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील 740 शिक्षकांनी घेतले प्रशिक्षण

चाकूर :13 नोव्हेंबर (मधुकर कांबळे )
मूल्यशिक्षणाचा सकारात्मक विचार प्रत्येक शाळेमध्ये होणे आवश्यक असून यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यात मूल्यवर्धन उपक्रम रुजवविला पाहिजे.त्याचबरोबर तालुक्यातील सर्व शाळांनी मूल्यवर्धन कार्यक्रमाची काटेकोर अमलबजावणी करावी असे प्रतिपादन चाकूरच्या गटशिक्षणाधिकारी मंदोदरी वाकडे यांनी केले.
महाळंग्रा येथील डी. बी. ग्रुपमध्ये महाराष्ट्र शासन व शांतीलाल मुथा फाउंडेशन पुणे यांच्यावतीने आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड व गट साधन केंद्र पंचायत समिती चाकूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय मूल्यवर्धन प्रशिक्षण कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्याच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी डी.बी.पब्लिक स्कूलचे प्राचार्य शशिकांत चिल्लरगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. श्रीहरी वेदपाठक, शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन बाळासाहेब येळापुरे, केंद्रप्रमुख ज्ञानोबा यादव, प्रशिक्षण समन्वयक रविंद्र चिमनदरे,जिल्हा सुलभक प्रकाश भालके यांची प्रमुख उपस्थिती होती.
चाकूर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांसाठी मूल्यवर्धन प्रशिक्षण देण्यात आले.यात तालुक्यातील 740 शिक्षकांनी प्रशिक्षण घेतले.या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर तर दुसरा टप्पा 10 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबर 2025 या कालावधीमध्ये घेण्यात आला. प्रशिक्षणाच्या उदघाटन कार्यक्रमास गट शिक्षणाधिकारी मंदोदरी वाकडे यांच्या समवेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मुरुड येथील अधिव्याख्याते डॉ. घनश्याम पौळ, डी. बी.फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयदीप यादव यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रशिक्षणात सुलभक म्हणून प्रदीप ढगे,रणजीत घुमे,मारुती वागलगावे, अनिल सुवर्णकार, दत्तात्रय बरदाळे, सत्तार शेख, देविदास माने,अनिल रोहिणेकर,इरबा गोटमुकले,सचिन जाधव,भीमाशंकर स्वामी, राजकुमार जक्कलवाड,विजय राऊत,घनश्याम स्वामी,विक्रम मुंडे यांनी प्रशिक्षणार्थ्याला प्रशिक्षण दिले. समारोप कार्यक्रमात प्रा.श्रीहरी वेदपाठक,बाळासाहेब येळापुरे यांनी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणार्थ्याच्यावतीने राम बिरादार व दमयंती माने यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश भालके यांनी केले. सूत्रसंचालन देविदास माने यांनी तर आभार प्रदर्शन रविंद्र चिमणदरे यांनी मानले.या कार्यक्रमास तालुक्यातील शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या प्रशिक्षणासाठी रविंद्र चिमणदरे, प्रकाश भालके, सतीश जाधव, महेताब शेख, सोमनाथ केंद्रे यांनी परिश्रम घेतले.


