आ.बाबासाहेब पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ
मतदार संघात कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेणारे पाटील हे पाहिले मंत्री

चाकूर : 15 डिसेंबर /मधुकर कांबळे
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघांचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आज रविवार दि.15 डिसेंबर रोजी नागपूर येथील राजभवनावर कॅबिनेट मंत्री म्हणून मंत्रिपदाची व गोपनीयतेची शपथ घेतली . राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी पाटील यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
तब्ब्ल वीस वर्षांनी चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघाला आ. बाबासाहेब पाटील यांच्या रूपाने मंत्रिपद मिळाले आहे.पहिले कॅबिनेट मंत्री होण्याचा मानही आ. पाटील यांच्या नावे जात आहे.यापूर्वी किशनराव देशमुख, रामचंद्रराव पाटील व विनायकराव पाटील यांनी राज्यमंत्री पदाचा कार्यभार सांभाळला आहे.
आ. बाबासाहेब पाटील यांची मंत्री म्हणून शपथ घेताच नागपुरात आलेल्या पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.तसेच चाकूर व अहमदपूर तालुक्यात फटाक्याची आतीषबाजी करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.शिरूर ताजबंद मध्ये तर दिवाळीच साजरी करण्यात आली.
=====================================
आ. पाटील यांनी दीक्षाभूमीत जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना केले अभिवादन
=====================================
मंत्री म्हणून शपथ घेण्याअगोदर दुपारच्या सुमारास आ. पाटील यांनी नागपूर येथील दीक्षाभूमीवर जाऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. यावेळी बौध्द अनुयायांनी पंचशील व त्रिशरण ग्रहण केले. तसेच आ. पाटील यांचा याठिकाणी सत्कारही केला.
सहकार व पणन मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चा ?
====================
आ. बाबासाहेब पाटील यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजभवना बाहेर ना. पाटील यांना सहकार व पणन मंत्री पद मिळणार असल्याची चर्चा ऐकवयास मिळत होती.नेमके खरेच कोणते खाते मिळणार हे लवकरच कळणार आहे.


