महाळंगी येथील दोन शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू

चाकूर: 26 मे / मधुकर कांबळे
चाकूर तालुक्यातील काही भागात वीज वादळीवाऱ्यासह पाऊस झाला असून यात महाळंगी येथील दोन शेतकऱ्यांचा वीज पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
सध्या पेरणीपूर्व मशागतीची कामे सुरु असून बहुतांश शेतकरी पेरणीपूर्वीच्या मशागतीच्या कामाला लागले आहेत.आज रविवार दि.26 मे 2024 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानकपणे वातावरणात बदल होऊन अवकाळी पाऊसाबरोबर सोसाट्याचा वारा सुटला. त्यातच विजेचाही मोठा कडकडाट झाला. तालुक्यातील महाळंगी, झरी सह अनेक गावाला याचा चांगलाच फटका बसला. त्यातच वीज पडून महाळंगी येथील दोन तरुण शेतकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे . मृतांमध्ये शिवाजी नारायण गोमचाळे (वय ३८ वर्ष ) व ओमशिवा लक्ष्मण शिंदे (वय वर्ष 30) यांचा समावेश आहे.शिवाजी गोमचाळे यांच्या पश्र्चात पत्नी, चार मुली, आई वडील असा परीवार आहे.तर ओमशिवा शिंदे यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,आई वडील असा परीवार आहे. 

तसेच शिवणखेड (बु.)येथील प्रभू रामा कोंपले यांच्या म्हशीवर वादळी वाऱ्याने झाड कोसळून मशीचा जागीच मृत्यू झाला आहे.झरी (खु.)येथील गणेश सूर्यवंशी या तरुण शेतकऱ्याच्या केळी बागेचे वादळी वाऱ्याने मोठे नुकसान झाले.चाकुर तालुक्यातील अनेक गावात घरांचे नुकसान झाले असून अनेकठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत.विद्युत खांबे पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. झाडाखाली लावलेल्या ऑटो, ट्रॅक्टर वर झाडे कोसळून त्यांचेही नुकसान झाले आहे. अचानकपणे उद्भवलेल्या अस्मानी सुलतानी संकटाने जीवित हानी झाली असून शेतकरी व सामान्य नागरिकांची धावपळ उडाली असल्याचे पाहावायस मिळाले.


