आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ.बाबासाहेब पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कोल्हापुरी बंधारे कामासाठी 138 कोटी रुपयांच्या कामास मंजुरी

बॅरेजमुळे होणार जलक्रांती ;446 हेक्टर शेतजमिनीचे क्षेत्र सिंचनाखाली येणार

चाकूर : 24 फेब्रुवारी /मधुकर कांबळे
अहमदपूर व चाकूर तालुक्यातील 8 कोल्हापुरी बंधाऱ्याला बॅरेजस मध्ये रूपांतर करण्याच्या प्रकल्पास राज्य शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यातील येस्तार, मावलगाव 1, मावलगाव 2, मानखेड, सोनखेड, चिलखा, टाकळगाव – शेणकुड व चाकूर तालुक्यातील टाकळगाव – शेळगाव या कोल्हापुरी बंधाऱ्याचा सामवेश आहे. मागील 20 वर्षापासून या बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा होत नव्हता, जुन ते सप्टेंबर दरम्यान पावसाळा हंगामात पाणी साठवून ठेवण्यासाठी दरवाजे बंद करण्यात यायचे व पाणी क्षमता वाढल्यानंतर पाणी सोडण्यात यायचे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जात असल्यामुळे त्यांना नुकसानीचा सामना करावा लागायचा. तसेच पाणी साठवण क्षमता देखील कमी व्हायची. पण येणाऱ्या काळात या बॅरेजस मुळे ही समस्या दूर होणार आहे.
या प्रकल्पामुळे एकूण 446 हेक्टर शेतजमिनीचे सिंचन होणार असून यासाठी एकूण 138.21 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यामध्ये अहमदपूर तालुक्यात 7 तर चाकूर तालुक्यात 1 बॅरेज असून आ. बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नातून आणि सातत्याने पाठपुरावा केल्याचे हे फलित आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण पहावयास मिळत असून सर्व शेतकऱ्यांनी आ. बाबासाहेब पाटील यांचे आभार व्यक्त केले आहे.या प्रकल्पामुळे परिसरातील नव्हे, तर अहमदपूर – चाकूर तालुक्यातील काही भागाचा पिण्याचे पाणी व वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमाचा मार्गी लागणार आहे. यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागाला देखील फायदा होणार आहे.
हे महत्वाकांक्षी प्रकल्प सुरु होण्यासाठी आमदार बाबासाहेब पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्याने प्रकल्पास मंजुरी मिळाली. त्याबद्दल आमदार बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री बाळासाहेब जाधव साहेब यांचे आभार मानले आहेत. यासोबतच अधीक्षक अभियंता इलियास चिस्ती , लातूरचे कार्यकारी अभियंता महेंद्र काळे, उपअभियंता सुरेश मंडलापुरे, व्यंकट पाटील, सहाय्यक अभियंता सुशांत शिंदे, अमित पवार, कटकमवार यांच्यासह या कामासाठी प्रमुख मार्गदर्शन करणारे अभियंता प्रमोद शिंदे या सर्व अधिकारी व प्रशासनाचे देखील आभार आ. पाटील यांनी व्यक्त केले आहे.

माझे मार्गदर्शक माजी मंत्री बाळासाहेब जाधव साहेबांचे हे स्वप्न होते. त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघात साठवण तलावाच्या माध्यमातून त्यांनी जलक्रांती घडवून आणली होती.त्यांच्या दूरदृष्टी व मार्गदर्शनाखाली मी हे स्वप्न बघितले होते.ते आज सत्यात उतरत आहेत याचा मला आनंद आहे.हा प्रकल्प नव्याने मंजुर झाल्याने आता शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. कारण कोरडवाहू जमिनी आता सिंचनाखाली येणार आहे, त्यामुळे बारा महिने शेतकरी पिके घेऊ शकतील, तसेच आता पाण्याची चिंता मिटल्याने परिसरातील शेतकरी आनंदीत आहेत. शेतकऱ्यांचा आनंद हीच मी केलेल्या कामाची पावती समजतो. मी जे स्वप्न बघितले होते ते आज आपल्या सर्वांच्या सहकार्याने पूर्ण होत आहे.हा कामाचा संकल्प जलक्रांतीचा व शेतकऱ्यांच्या हिताचा असून शेतकऱ्यांसह मतदारसंघाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी मी कटिबद्ध आहे.
====================
आ. बाबासाहेब पाटील
अहमदपूर चाकूर विधानसभा मतदार संघ
===================

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??