शैक्षणिक कार्यासाठी खालापूर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे डीबी इन्स्टिट्यूट ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष दिनेश बेंबडे यांचा सन्मान

चाकूर : 14 जुलै / मधुकर कांबळे
शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल चाकूर तालुक्यातील महाळंग्रा येथील डी.बी इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष दिनेश बेंबडे यांचा खालापूर शिक्षण प्रसारक मंडळातर्फे सन्मान करण्यात आला आहे.
बेंबडे यांनी महाळंग्रा सारख्या ग्रामीण भागामध्ये डी. फार्मसी, बी. फार्मसी, एमबीए तसेच पहिली ते बारावी पर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळाची उभारणी केली असून विविध पदवीच्या अभ्यासक्रमात डी.बी.ईन्स्टिट्यूटच्या कॉलेजमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.त्यामुळे चाकूर तालुक्यातील ग्रामीण भागात ज्ञान केंद्र म्हणून डी.बी.ईन्स्टिट्यूट हे सर्वदूर परिचित झाले आहे.
दिनेश बेंबडे हे शिक्षण क्षेत्रामध्ये नवनवीन आगळावेगळा उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सातत्याने करीत असतात. त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन बी. एल. पाटील पॉलिटेक्निकल कॉलेजचे प्राचार्य प्रशांत माने यांनी बेंबडे यांना विशेष निमंत्रण दिले होते.खोपोली येथील खालापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संतोष जंगम तसेच काशी होम प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक तथा खालापुर शिक्षण मंडळाचे सदस्य यशवंत साबळे व खालापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे नवनिर्वाचित सदस्य कैलास गायकवाड यांच्या उपस्थितीत दिनेश बेंबडे यांना पुष्पगुच्छ,स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी त्यांच्यासोबत सोलापूर व पुणे येथील फाईव्ह स्टार हॉटेल उद्योजक शरद उर्फ तात्या साठे, यांचाही सन्मान करण्यात आला.
मराठवाडा म्हटलं की दुष्काळग्रस्त भाग म्हणून महाराष्ट्रामध्ये एक ओळख आहे. त्या दुष्काळग्रस्त ग्रामीण भागामध्ये शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी कुटुंबातील मुलांना विविध प्रकारच्या पदवीचे शिक्षण प्राप्त करून देण्याची संधी दिनेश बेंबडे यांनी उपलब्ध केली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील व गोरगरीब विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देऊन शैक्षणिक क्षेत्रात आपले कर्तृत्व दिनेश बेंबडे यांनी सिद्ध केले आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रातील विश्वसनीय नाव म्हणून ओळख निर्माण करणारे दिनेश बेंबडे तसेच हॉटेल क्षेत्रातील विश्वसनीय नाव शरद साठे यांचा खालापूर शिक्षण मंडळातर्फे सन्मान करण्यात आला.
खालापूर शिक्षण प्रसारक मंडळ हे रायगड जिल्ह्याच्या खालापूर तालुक्यात एक विश्वासपूर्ण मंडळ आहे. खालापूर तालुका म्हणजेच आदिवासी ग्रामीण भाग आहे. या आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना खालापूर शिक्षण मंडळाच्या विविध शाखेत शिक्षण दिले जात आहे.त्यामुळे बेंबडे यांनी खालापूर शिक्षण प्रसारक मंडळाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.तसेच सन्मान केल्याबद्दल संस्थेचे आभारही बेंबडे यांनी मानले आहेत.


