चाकूरचे नगराध्यक्ष कपिल माकणे यांचा राजीनामा,नवीन नगराध्यक्षपदासाठी उद्याच अर्ज दाखल केला जाणार
कोण होणार नवीन नगराध्यक्ष याची चाकूरकरांना उत्सुकता

चाकूर : 20 मे / मधुकर कांबळे
चाकूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष कपिल माकणे यांनी सोमवार दि.19 मे 2025 रोजी आपल्या पदाचा जिल्हाधिकारी यांच्याकडे राजीनामा दिला असून जिल्हाधिकारी यांनी माकणे यांचा राजीनामा मंजूर केला आहे. या रिक्त पदासाठी 26 मे रोजी नवीन नगराध्यक्षपदाची निवड केली जाणार असून उद्याच नवीन नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करणार असल्याने उद्या नेमका कोणाचा अर्ज दाखल होणार ? याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
नगराध्यक्ष हे नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात,चाकूर येथे वास्तव्यास न राहता लातूरला राहत असल्याने ते या पदासाठी वेळ देऊ शकत नाहीत त्यामुळे नगरपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात विस्कळीतपणा येत आहे.नियमबाह्य पद्धतीने भ्रष्टाचारयुक्त कारभार चालवतात त्यामुळे आम्हा नगरसेवकांचा नगराध्यक्ष यांच्यावर विश्वास राहिलेला नाही असा आरोप करीत मंगळवार दि.13 मे 2025 रोजी चाकूर नगरपंचायतीच्या 14 नगरसेवकांनी नगराध्यक्ष कपिल माकणे यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला होता.यासाठी चाकूर अहमदपूरच्या उप विभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे यांच्या अध्यक्षतेखाली 19 मे रोजी सकाळी 11 वा.नगरपंचायत सभागृहात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते.परंतु विशेष सभेच्या काही मिनिटांपूर्वीच कपिल माकणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे राजीनामा दिला. त्यामुळे चाकूरचे नगराध्यक्ष पद रिक्त झाल्याचे पिठासीन अधिकारी डॉ. लटपटे यांनी सभागृहात व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.
उद्याच नवीन नगराध्यक्ष अर्ज दाखल करणार
चाकूर नगर पंचायतचे नगराध्यक्ष पद रिक्त झाल्याने नवीन नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून 21 मे 2025 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल केले जाणार आहे. छाननी ही उद्याच होणार असून 22 मे रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र मागे घेतले जाणार आहे. एकपेक्षा अधिक नामनिर्देशन पत्र दाखल झाले तर 26 मे रोजी नगराध्यक्ष पदासाठी मतदान घेतले जाणार आहे.मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच , राष्ट्रीय काँग्रेस तीन , यांच्यासह भाजपचे दोन व प्रहारचे चार जण अशा एकूण 14 नगरसेवकांनी माकणे यांच्यावर दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर सह्या केल्या असल्यामुळे यांच्याकडून एकच नामनिर्देशन पत्र दाखल केले जाणार असल्याची खात्रीदायक माहिती मिळत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने उद्याच नवीन नगराध्यक्ष कोण होणार हे स्पष्ट होणार आहे. परंतु नेमकी यासाठी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता चाकूरकरांना लागली आहे.


