राष्ट्रवादीचे करीम गुळवे चाकूरचे नवीन नगराध्यक्ष होणार
26 मे रोजी करीम गुळवे यांच्या नावाची अधिकृत घोषणा .

चाकूर -21 मे /मधुकर कांबळे
राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते तथा नगरपंचायतचे गटनेते करीम गुळवे हे चाकूरचे नवीन नगराधक्ष होणार हे निश्चित झाले असून त्यांच्या नावाची 26 मे रोजी अधिकृत घोषणा केली जाणार आहे.त्याच दिवशी ते नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारतील.
आज बुधवार दि.21 मे 2025 रोजी नगराध्यक्ष पदासाठी पंचायत समितीचे माजी सभापती तथा नगर पंचायतचे गटनेते करीम गुळवे यांनी मुख्याधिकारी प्रतीक लंबे यांच्याकडे नगराध्यक्ष पदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले. दुपारी 2 वाजल्यानंतर उपविभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे यांच्या उपस्थितीत नामनिर्देशन पत्राची छाननी करण्यात आली असून नगराध्यक्ष पदासाठी एकमेव नामनिर्देशन पत्र आले असून ते वैध असल्याचे डॉ. लटपटे यांनी सांगितले.त्यामुळे ही निवड बिनविरोध होणार असून या निवडीची फक्त औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच,काँग्रेस तीन,भाजप दोन व प्रहार पक्षातील चार नगरसेवकांचा भक्कम असा पाठिंबा करीम गुळवे यांना असल्याने त्यांच्या विरोधात कोणाचाही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.
नगरपंचायतचे नगराध्यक्ष कपिल माकणे यांच्यावर 14 नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर कपिल माकणे यांनी 19 मे रोजी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्द केला. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नगराध्यक्ष पद रीक्त करून नवीन नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला.त्यानुसार आज 21 मे रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची वेळ होती. विहित वेळेत फक्त करीम गुळवे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्यामुळे निवड बिनविरोध होणार आहे.
साईप्रसाद हिप्पाळे प्रभारी नगराध्यक्ष
====================
नवीन नगराध्यक्षांची निवड होईपर्यंत प्रभारी नगराध्यक्ष म्हणून उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला असून हिप्पाळे यांनी आज रीतसर नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला.
साईप्रसाद हिप्पाळे प्रभारी नगराध्यक्ष


