सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करीम गुळवे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारला
करीम गुळवे चाकूरचे पाचवे नगराध्यक्ष, विविध स्तरातून अभिनंदन

चाकूर – 27 मे /मधुकर कांबळे
राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत चाकूरचे पाचवे नगराध्यक्ष म्हणून करीम गुळवे यांनी सोमवार दि.26 मे 2025 रोजी पदभार स्वीकारला. 
नगरपंचायतचे नगराध्यक्ष कपिल माकणे यांच्या विरोधात 13 मे 2025 रोजी 14 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर कपिल माकणे यांनी 19 मे रोजी नगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे दिला होता . त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी नवीन नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर केला.त्यानुसार 21 मे रोजी करीम गुळवे यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले होते. त्यामुळे गुळवे यांच्या नावाची औपचारिकता शिल्लक राहिली होती.
नगराध्यक्ष निवडीसाठी चाकूर नगरपंचायतच्या सभागृहात सोमवार दि.26 मे 2025 रोजी उपविभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी डॉ.मंजुषा लटपटे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.एकच नामनिर्देशन पत्र असल्यामुळे डॉ.लटपटे यांनी नगराध्यक्ष म्हणून करीम गुळवे यांच्या नावाची घोषणा केली.यावेळी मुख्याधिकारी प्रतीक लंबे उपस्थित होते.त्यानंतर सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत करीम गुळवे यांनी नगराध्यक्ष पदाचा रीतसर पदभार स्वीकारला. ना.पाटील यांनी करीम गुळवे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.नगराध्यक्ष म्हणून गुळवे यांच्या नावाची घोषणा होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटक्याची अतिषबाजी करीत आनंदोत्सव साजरा केला.तसेच चाकूर व अहमदपूर तालुक्यातील विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व सामाजिक संघटनेच्यावतीने करीम गुळवे यांचा सत्कार करण्यात आला.
सहकार मंत्री ना. पाटील यांचे अत्यंत विश्वासू व निकटवर्तीय म्हणून करीम गुळवे यांची ओळख असून त्यांनी दोनवेळा चाकूर ग्रामपंचायतचे उपसरपंच, अहमदपूर पंचायत समितीचे सदस्य व चाकूर पंचायत समितीचे सभापती म्हणून काम केले असून दोनवेळा संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्षपदही सांभाळले आहे. प्रशासन सांभाळण्यांचा त्यांचा अनुभव दांडगा आहे.राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांसह काँग्रेस तीन,भाजप दोन व प्रहारच्या चार नगरसेवकांनी गुळवे यांना पाठिंबा दिला आहे.
आजतगाचे नगराध्यक्ष व त्यांचा कार्यकाळ
====================
1. मिलिंद गणपतराव महालिंगे
(27.11.2015 ते 26.5.2018)
2. रुपाली सिद्धेश्वर पवार
(28.5.2018 ते 27.11.2020)
3. कपिल गोविंदराव माकणे
(9.2.2022 ते 19.5.2025)
4. साईप्रसाद शिवराज हिप्पाळे
(19.5.2025 ते 25.5.2025) प्रभारी


