चोरी करून दुहेरी खून करणाऱ्या आरोपीला 12 तासात अटक , स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

चाकूर : 28 मे /मधुकर कांबळे
रेणापूर तालुक्यातील गरसोळी येथील वयोवृद्ध दांपत्यांचा खून करून फरार झालेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले असून या खून्यातील आरोपीला शास्त्रोक्त पध्दतीने तपास करत अवघ्या 12 तासाच्या आत चोरी करीत असताना केलेल्या दुहेरी खुनातील आरोपी अटक करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की दि. 25 मे ते 26 मे 2025 च्या मध्यरात्री पोलीस ठाणे रेणापूर हद्दीतील मौजे गरसोळी गावातील शेतामध्ये राहत असलेल्या वयोवृद्ध कातळे दांपत्याच्या घरातील चोरी करीत असताना विरोध केल्याने वयोवृद्ध कातळे दांपत्यांचा खून करून महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली होती. यामध्ये वयोवृद्ध महिलेच्या अंगावरील सोने चोरून तिच्या डोक्यात कुकरने, दगड व विटाने मारून तसेच तिच्या अपंग पतीस उचलून घेऊन जाऊन बाजूच्या विहिरीत टाकून खून केल्याचे दि. 27 मे 2025 रोजी समोर आले होते. त्यावरून दि. 27 मे 2025 रोजी पोलीस ठाणे रेणापूर येथे गुरनं.187/2025 कलम 103(1) 309(4), 331(3)(4) भारतीय न्याय संहीता प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या निर्देशावरून अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाची दिशा ठरवून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकाला सखोल मार्गदर्शन व सुचना करुन सदरील पथकाला आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आले होते. पथकाने गोपनीय बातमीदार नेमून शास्त्रोक्त पध्दतीने तपासाला सुरुवात केली. गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीवरून वयोवृद्ध कातळे दांपत्यांच्या मारेकरऱ्याचा शोध घेतला. सदर पथकांने गोपनीय व शास्त्रोक्त माहितीच्या आधारावर नमुद गुन्ह्यातील व गरसोळी गावातच राहणारा इसम पंडित कोंडीबा रावणकुळे, वय 32 वर्ष, राहणार गरसुळी ता. रेणापूर जि. लातूर यास त्यांचे राहते ठिकाणाहून दिनांक 27 मे 2025 रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास गुन्हा दाखल झाल्याच्या 12 तासाचे आत आरोप निष्पन्न करून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्याने चोरी करण्याच्या उद्देशाने तसेच वयोवृद्ध महिला नेहमी संशयित आरोपीला,”तू चोर आहेस” असे म्हणत असल्याचा राग मनात धरून वयोवृद्ध कातळे दांपत्यांचा खून करुन महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने चोरल्याचे कबुल केले आहे. या आरोपी विरुद्ध यापूर्वी चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे समजते.गुन्हयाचा पुढील तपास रेणापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निकम हे करीत आहेत.
सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक सोमय मुंडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलीस उपनिरीक्षक राजाभाऊ घाडगे, पोलीस अंमलदार माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे तुराब पठाण, राजेश कंचे, संजय कांबळे, नकुल पाटील, सायबर सेलचे संतोष देवडे, गणेश साठे यांनी केली आहे.


