चाकूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत,अनेकांच्या घरात शिरले पाणी
तालुक्यातील बरेच रस्ते बंद, काही ठिकाणी घरांची पडझड तर अनेक शेताला तळ्याचे रूप

चाकूर : 28 ऑगस्ट / (मधुकर कांबळे )
काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चाकूर तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून पावसाचे पाणी अनेकांच्या घरात शिरल्याने नागरिकांची मोठी तारांबळ उडाली असून घरातील पाणी काढायचे कसे या विवंचनेत नागरिक असून पाण्याच्या घरात राहायचे कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

त्याचबरोबर काही ठिकाणच्या पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे बऱ्याच ठिकाणची वाहतूक सायंकाळपर्यंत बंद झाली होती. याच पावसामुळे अनेक घरांची पडझड झाली असून शेतात पाणी साचल्याने काही शेताला तळ्याचे रूप निर्माण झाले आहे.
या पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला असून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकात पाणी साचल्याने काहीठिकाणी पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तर चाकूर शहरातील मस्जिद चौक ते लक्ष्मी नगर भागातील अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने तेथील लोकांची मोठी तारांबळ उडाली असून घरातील पाणी बाहेर काढण्यासाठी त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.अशीच परिस्थिती तालुक्यातील अनेक गावात झाली आहे.अति पाऊस झाल्यामुळे काही घरांची पडझड झाली असून काहीठिकाणी झाडे कोलमडून पडली आहेत.
चाकूरच्या केंद्रीय विद्यालय परिसरामध्ये पाणी साचल्यामुळे या शाळेतील विद्यार्थी व शिक्षक कर्मचाऱ्यांना शाळेतून बाहेर पडण्यासाठी तब्बल तीन तासापेक्षा जास्त काळ शाळेतच अडकून पडावे लागले होते.
सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर पडता आले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. मंजुषा लटपटे, तहसीलदार नरसिंग जाधव, पोलीस निरीक्षक बालाजी भंडे, गटशिक्षणाधिकारी मंदोदरी वाकडे, गटसाधन केंद्राचे प्रकाश भालके, सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी उपस्थित होते.सकाळीच पावसाचा जोर वाढल्यामुळे बहुतांशी शाळांनी विद्यार्थ्यांची सुरक्षा लक्षात घेता विद्यार्थ्यांना सुट्टी दिल्याची माहिती मिळत आहे.या पावसाच्या वाढत्या धोक्यामुळे सर्व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
या झालेल्या पावसामुळे घरणी मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाला असून बोथी तलाव शंभर टक्के भरला आहे. शेळगाव येथील तिरू नदीवरील पुल पाण्याखाली आला असून बोथी गावात जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहू लागले होते.सांडोळ पाझर तलावाने धोक्याची पातळीवर ओलांडली असून तलावाचे पाणी सांडव्याद्वारे काढून देण्यात आले आहे. लिंबाळवाडी पुलही पाण्याखाली आला असून चाकूर आटोळा रस्त्यावर पाणी साचले आहे तर हटकरवाडी नळेगाव रस्ता बंद झाल्याची माहिती मिळत आहे.एकदारीत पावसाने सर्वत्र हाहाकार माजला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.


