चाकूरच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा मंदोदरी वाकडे यांनी पदभार स्वीकारला

चाकूर : 6 जून /मधुकर कांबळे
चाकूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा मंदोदरी वाकडे यांनी बुधवार दि.4 जून 2025 रोजी रीतसर पदभार स्वीकारला.वाकडे यांच्या रूपाने चाकूर शिक्षण विभागाला दुसऱ्या महिला गटशिक्षणाधिकारी मिळाल्या आहेत.
चाकूर येथील गट साधन केंद्रात नूतन गटशिक्षणाधिकारी मंदोदरी वाकडे यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी अशोक पांचाळ यांच्याकडून पदभार स्वीकारला .यावेळी सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी दिलीप हैबतपुरे यांच्या हस्ते वाकडे यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर गट साधन केंद्राच्यावतीने सर्व कर्मचारी यांनीही वाकडे यांचा सत्कार केला. याच कार्यक्रमात नायब तहसिलदार शैलेश निकम यांचाही सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिलीप हैबतपुरे यांनी केले. प्रस्ताविकात तालुक्याचा लेखा-जोखा व गुणवत्तापूर्ण वाटचाल विषद करून नूतन गटशिक्षणाधिकारी यांना शुभेच्छा दिल्या.सूत्रसंचालन मरलापल्ले यांनी केले. तर आभार मुजीब शेख यांनी मानले.यावेळी मुक्तार पटेल,प्रकाश भालके,धनराज सूर्यवंशी, रविंद्र सोनकांबळे,संजय धायगुडे, रवि देशमुख,अलिम शेख, मेहताब शेख, सदाशिव मोघे, श्रीमती राऊत,शिक्षक संघाचे अध्यक्ष विवेकानंद स्वामी, भागवत माळी, बालाजी डावळे, माधव कानुरे, महेंद्र पाटील , कृष्णा पांचाळ , श्रीमती मुरगे यांच्या सह सर्व केंद्र प्रमुख, गट साधन केंद्रातील कर्मचारी, विषय साधनव्यक्ती, विशेष शिक्षक उपस्थित होते.
मंदोदरी आप्पासाहेब वाकडे -निकम यांचे मूळ गाव मंगळवेढा जि.सोलापूर असून सासर लातूर जिल्ह्यातील कासार जवळा आहे.त्यांनी एम. आय. टी. कॉलेज पुणे येथून इंजीनियरिंग ही पदवी घेतली असून 2018 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागात उपनिरीक्षक म्हणून निवड झाली होती.2019 ते 2022 या तीन वर्षाच्या कालावधीत मुंबई मंत्रालयात वित्त विभागात कक्ष अधिकारी म्हणून काम केले आहे.त्यानंतर पुन्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झाली.यापूर्वी त्या पंचायत समिती धारणी जिल्हा अमरावती येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत होत्या.
चाकूरचा शैक्षणिक नावलौकिक वाढविणार – मंदोदरी वाकडे
शिक्षण विभागातील सर्व अधिकारी,कर्मचारी, मुख्याध्यापक, शिक्षक या सर्वांच्या सहकार्याने काम करीत चाकूरची गुणवत्ता कायम ठेवत तालुक्याचा अधिकाधिक शैक्षणिक नावलौकिक वाढविणार असल्याचा मनोदय नूतन गटशिक्षणाधिकारी मंदोदरी वाकडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर व्यक्त केला.



