सहकारमंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी हाडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांचे फेडले कर्ज
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे- सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील

चाकूर : 5 जुलै (मधुकर कांबळे )
अहमदपूर तालुक्यातील हाडोळती येथील शेतकरी अंबादास पवार यांच्या शेतात स्वत: नांगर ओढतानाचे छायाचित्र व्हायरल झाले होते. यानंतर राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी तातडीने या शेतकऱ्याशी संपर्क साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. तसेच त्यांचे पीककर्ज फेडण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार सहकार मंत्र्यांनी आज शनिवार दि.5 जुलै रोजी हाडोळती येथे पवार दाम्पत्यांची भेट घेऊन त्यांच्यावर असलेले कर्ज भरले. तसेच शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकरी अंबादास पवार यांच्याकडे हडोळती विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे थकीत कर्ज फेडण्यासाठी सहकार मंत्री ना.पाटील यांनी सोसायटीच्या पदाधिकारी, अधिकारी यांच्याकडे सुमारे 42,500 रुपये सुपूर्द केले. तसेच या रक्कमेचा भरणा करून बेबाकी प्रमाणपत्र पवार यांना सुपूर्द करण्यात आले आले आहे.
याप्रसंगी त्यांच्यासमवेत मराठवाडा शिक्षण विभागाचे आमदार विक्रम काळे, अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार उज्वला पांगरकर, तालुका कृषी अधिकारी सचिन बागवे, सहाय्यक निबंधक पालवे , गटविकास अधिकारी पंकज शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस शिवानंद हेंगणे, अहमदपूर तालुकाध्यक्ष शिवाजीराव देशमुख,महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्ती कांबळे, माधव पवार, शरद पवार, आशिक तोगरे, अशोक सोनकांबळे, विजय पवार सह विविध मान्यवर उपस्थित होते.
राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत.
=================
ना. बाबासाहेब पाटील
सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य .


