मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या शुभारंभ
ग्रामसभेला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे यांचे नागरिकांना आवाहन

चाकूर : 16 सप्टेंबर (मधुकर कांबळे )
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्या बुधवार दि.17 सप्टेंबर 2025 रोजी शुभारंभ करण्यात येणार आहे.
चाकूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीमध्ये या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण प्रोजेक्टर आणि टी.व्ही.द्वारे करण्यात येणार आहे. अभियानाची सुरुवात ग्रामसभेत प्रति व्यक्ती एक वृक्ष लागवड करून करण्यात येणार आहे.
या अभियानात सुशासनयुक्त गाव,आर्थिक स्वावलंबन, जल समृद्धी, योजनांचे अभिसरण, संस्थाचे सक्षमीकरण, उपजिविका विकास आणि लोकसहभाग असे सात मुख्य घटक आहेत. गावांच्या सर्वांगीण विकासाचा या संकल्पनेतून प्रत्येक घरात नळाद्वारे शुद्ध पाणी, आयुष्मान भारत यासारख्या योजनाचा लाभ डिजिटल शाळा, रोजगारच्या संधी आणि महिलांचे सक्षमीकरण या सारखे अनेक फायदे नागरिकांपर्यंत पोहोचतील. अभियानामध्ये भाग घेतलेल्या ग्रामपंचायतीचे शंभर गुणांची खालील घटकनिहाय तपासणी होणार आहे. त्यात सुशासन युक्त पंचायत 16 गुण, सक्षम पंचायत 10 गुण, जल समृद्ध, स्वच्छ व हरित गाव 19 गुण, मनरेगा व इतर अभिसरण कामे 6 गुण, गावापातळीवरील संस्था सक्षमीकरण 16 गुण, उपजिविका विकास, सामाजिक न्याय 23 गुण, लोकसहभाग व श्रमदानं लोकचळवळ निर्माण करणे 5 गुण, नावीन्यपूर्ण उपक्रम 5 गुण असे एकूण 100 गुणांचे मूल्यांकन होणार असून त्यातून राज्य, विभाग, जिल्हा व तालुकास्तरावर प्रथम ,द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या ग्रामपंचायतीना बक्षिसे दिली जाणार आहेत.या होणाऱ्या ग्रामसभेस जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे यांनी केले आहे.


