आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तंबाखू सोडा…… कॅन्सर टाळा, रोजचाच दिवस असू दे तंबाखू विरोधी दिवस !

(आज तंबाखू विरोधी दिवस. त्यानिमित्ताने दंतचिकीत्सक डॉ. शितल विलासराव चापोलीकर यांचा हा महत्वपूर्ण लेख वाचकांसाठी )

चाकूर : 31 मे /हल्लाबोल विशेष
(आज 31 मे.तंबाखू विरोधी दिवस. त्यानिमित्ताने दंतचिकीत्सक डॉ. शितल विलासराव चापोलीकर यांचा हा महत्वपूर्ण लेख वाचकांसाठी )

======================================
तोंडाचा कॅन्सर (Mouth Cancer)…. कर्करोग (Cancer) म्हटलं की सर्वसामान्य माणसाचं धैर्य पुर्णतः खचून जातं … व तो सगळं संपलं या निरर्थक विचारांच्या अधिन होतो. कॅन्सर…. मग तो कुठलाही असो …. त्याचं वेळीच निदान झालं अन त्यावर योग्य ठिकाणी यथायोग्य उपचार झाले तर इतर व्याधींसारखचं यावर देखील आपण विजय मिळवू शकतो. गरज असते ती एका …. स्विकाराची आणि निर्णयाची ….
भारतात होणाऱ्या एकूण कॅन्सरच्या प्रकारांपैकी तोंडाच्या कर्करोगाचे हे प्रमाण एक तृतीयांश टक्के आहे. दरवर्षी आपल्या भारत देशामध्ये ७५००० मृत्यू या कर्करोगामुळे होतात. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये तरुण लोकांचं प्रमाण लक्षणीय आहे.
काय आहेत कारणे :
तोंडाचा कर्करोग हा प्रामुख्याने ओठ, जीभ, हिरड्या, गालाच्या आतील बाजूस होतो किंवा तोंडात कोठेही जखम, गाठ असेल तर याची हि सुरुवात समजावी. गुटखा, सिगारेट व तस्यम पदार्थामधून तंबाखूचे सेवन हे तोंडाच्या कर्करोगाचे प्रमुख कारण आहे.
काय आहेत लक्षणे :
तोंडाचा कर्करोग झाल्यानंतर तोंडात गालाच्या आतल्या बाजूला फोड येतो. ज्याला आपण तोंड येणे असे देखील म्हणले जाते. त्याचबरोबर तोंडात इजा होणे, ओठ फाटणे आणि जखम सहजसाहजी न भरणे अशी सामान्य लक्षणे दिसायला लागतात.  तोंडाचा कर्करोग होताना सुरूवातीस तोंडाच्या आतल्या बाजूला पांढरा फोड येतो.  जर तोंडात बराच काळ पांढरा डाग, जखम, तोंड आलं असेल, तर तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर तोंडातून दुर्गंध येणे, आवाज बदलणे, आवाज बसणे, काही गिळण्यात त्रास होणे, जास्त लाळ किंवा रक्त येणे, ही देखील तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे आहेत. यामध्ये जखमा, सूज, रक्तस्त्राव, जळजळ, तोंडात दुखणे अशी लक्षणे दिसतात.
एक किंवा अधिक दातांमध्ये विनाकारण कमकुवतपणा येणे किंवा ते पडणे हे देखील कर्करोगाचे लक्षण असू शकते. तसंच जर दात काढला असेल आणि त्या जागचा खड्डा भरत नसेल तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधायला हवा. तोंडाच्या कर्करोगाचा उपचार शस्त्रक्रिया, रेडिएशन आणि केमोथेरपीसह अनेक प्रकारे केला जातो. शिवाय हे उपचार त्या व्यक्तीचे वय, आरोग्याची स्थिती आणि स्टेजवर अवलंबून असतात.हिरड्या, जीभ टॉन्सिल किंवा तोंडावर लाल आणि पांढरे डाग उठणे हे धोकादायक ठरु शकते. या स्थितीला ल्युकोप्लाकिया असे म्हणतात. बहुतेक ल्युकोप्लाकिया पॅच नॉन -कॅन्सरचे असतात. परंतु, बर्‍याच कर्करोगाचे हे लक्षणे असू शकते. जे तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होऊ शकते.
इतर जोखीम घटक :
मौखिक अस्वच्छता,दातांची जळजळ,ह्युमन पॅपिलोमा व्हायरस इंफेक्शन,मधुमेह,इम्युन्योसप्रेसिव्ह ओषधांचा मोठ्या प्रमाणात वापर.

प्रतिबंध :
तंबाखूचे सेवन करणारी व्यक्ती ही स्वतःसाठी आणि समाजासाठीही धोकादायक असते. धूम्रपान करणाऱ्या आणि तंबाखू खाणाऱ्या लोकांमुळे होणाऱ्या पर्यावरणीय प्रदूषणाचा परिणाम तंबाखू न खाणाऱ्या व्यक्तीवरही होतो. तंबाखू सेवन हा आजार आहे. त्यावर उपचार करावे लागतात. तंबाखू बंद करण्यासाठी योग्य योजना आवश्यक आहे.
या गोंष्टींची घ्या काळजी:
-धूम्रपान करू नका – कर्करोगाच्या सुरुवातीच्या लक्षणांसाठी तुमची तोंडाची नियमितपणे तपासणी करावी.- तुमच्या दातांच्या डॉक्टरांना नियमित भेट द्या – तोंडात जखम झाली असेल तर ताबडतोब तपासणी करून घ्या
उपचार:
कॅन्सर जर पहिल्या किंवा दुसऱ्या स्टेजमध्ये असेल तर सामान्यपणे शस्त्रक्रिया (Surgery) करून कॅन्सर काढून टाकण्याला प्राधान्य दिले जाते. मानेमध्ये गाठी असतील तर त्याही काढून टाकल्या जातात. यामध्ये रुग्णांच्या जीभ, जबडे, गाल या अवयांची झालेली हानी आधुनिक पद्धतीने (RECONSTRUCTION) प्लास्टिक सर्जनच्या मदतीने इतर अवयवांचा वापर करून भरून काढली जाते. या मध्ये मनगटावरील त्वचा व नाडीच्या रक्तवाहिन्यांपासून नवीन जीभ किंवा गाल बनवणे, पायातील पिंढारीच्या हाडापासून नवीन जबडा बनवणे तसेच त्यावर दांत रोपंण करणे संभव आहे. यालाच ऑन्कॉप्लास्टिक सर्जरी (Oncoplastic Surgery) म्हणतात. चेहरा कुठल्याही परिस्थितीत विद्रुप होणार नाही किंवा या कर्करोगाचा परिणाम जाणवणार नाही हि देखील काळजीघेतली जाते.
तिसऱ्या स्टेजमधील कॅन्सरमध्ये ऑपेरेशन नंतर रेडिएशन ची गरज भासते. रेडिएशनच्या माध्यमातून आजार परत येण्याची शक्यता कमी करता येते. कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये CHEMOTHEROPY चा उपचार दिला जातो या स्टेजला मात्र रुग्णाचे आयुष्य कसे वाढवता येईल याचाच विचार करावा लागतो. शेवटी आजाराची व्याप्ती व खोली यावरच उपचारांचे भवितव्य अवलंबून असते. यास्तव वेळीच जागे होऊन वर नमूद केलेली तोंडाच्या कॅन्सरची लक्षणे आपल्याला थोड्याफार प्रमाणात जरी जाणवत असतील तर जराही वेळ न दवडता सजगतेने तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा… हे मात्र नक्की.!
डॉ. शितल विलासराव चापोलीकर
दंतचिकीत्सक

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??