आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटनेमुळेच सर्वांना मतदानाचा हक्क – सहकारमंत्री ना. बाबासाहेब पाटील यांचे प्रतिपादन

भीमजयंती निमित्त चाकूर तालुक्यात व शहरात विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

चाकूर : 14 एप्रिल /मधुकर कांबळे
जगातील सर्वात मोठी लिखित राज्यघटना ही महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिली असून या घटनेच्या माध्यमातून देशात समता स्थापन करण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे.याच घटनेमुळे भारतातील नागरिकांना मतदानाचा मूलभूत हक्क मिळाला असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांनी केले.
चाकूर येथील नालंदा बुद्ध विहारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मुख्य ध्वजारोहण व अभिवादन कार्यक्रमात सहकार मंत्री ना.पाटील बोलत होते.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष शिवाजीराव काळे, महेश बँकेचे संचालक शिवानंद हेंगणे,नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे,माजी सरपंच किशनराव रेड्डी,स्वागताध्यक्ष तथा नगरसेवक मिलिंद महालिंगे,नगरसेवक नितीन रेड्डी,राष्ट्रवादीचे चाकूर शहराध्यक्ष शिवशंकर हाळे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल वाडकर,बाजार समितीचे संचालक लक्ष्मण तिकटे,राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष विष्णू तिकटे,तालुकाध्यक्ष विश्वनाथ एडके आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या भाषणात पुढे बोलताना ना. पाटील म्हणाले की भारतीय घटना लिहीत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जगातील सर्व घटनांचा अभ्यास केला असून स्वातंत्र्य, समता, न्याय,बंधूता ही प्रमुख तत्वे घटनेत समाविष्ट केली आहेत.शिक्षणाला फार मोठी किंमत असते असे सांगून ज्ञानाला किती किंमत आहे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी जगाला दाखवून दिले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने देशभरात 16 नामवंत विद्यापीठे असून त्यातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डॉ. आंबेडकरांनी पत्रकारिता क्षेत्रात निर्भीड पत्रकार म्हणून काम केले आहे.समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी त्यांनी जीवनभर संघर्ष केला.शिक्षण, जलसिंचन, ऊर्जा या क्षेत्रातही मोठे भरीव काम केले आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीदिनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा ध्यास घ्यावा तर तरुणांनी व्यसनापासून दूर राहावे हा संकल्प करावा असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास ना. पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. याच कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी, पोलिस दलात नव्याने भरती झालेले विद्यार्थी यांचाही सत्कार ना. पाटील यांच्याहस्ते करण्यात आला.
सकाळच्या सत्रात शहरातील विविध भागात पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.क्रांतीनगर येथे उपनगराध्यक्ष साईप्रसाद हिप्पाळे,छत्रपती शाहू महाराज चौक सिद्धार्थनगर येथे उप विभागीय पोलिस अधिकारी बी. चंद्रकांत रेड्डी, सिद्धार्थ नगर येथे जेष्ठ पत्रकार अनिल वाडकर, बालाजी पाटील चाकूरकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये राष्ट्रवादी सेवा दलाचे तालुकाध्यक्ष शिवदर्शन स्वामी,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात जेष्ठ पत्रकार अनिल वाडकर, वैशाली बुद्ध विहार येथे बाजार समितीचे संचालक लक्ष्मण तिकटे, लिंबोनी नगर येथे माजी नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राजकीय,सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर बौध्द उपासक,उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??