राचन्नावाडी येथे धाडसी चोरी,दहा तोळे सोने व एक किलो चांदीसह 95 हजार रुपये रोकड चोरीला
दीड महिन्यातील चोरीची दुसरी घटना,चोरट्यां टोळीला पकडण्याचे पोलिसांसमोर आव्हान.

चाकूर : 29 जून / मधुकर कांबळे
चाकूर तालुक्यातील राचन्नावाडी येथे काल शुक्रवार दि.28 जून 2024 रोजी पहाटे चोरट्या टोळीने धाडसी चोरी करत सहा घरे फोडून दहा तोळे सोने, एक किलो चांदीसह 95 हजारांची रोकड लंपास केली आहे.राचन्नावाडी येथे दीड महिन्यात अशी चोरीची दुसरी घटना घडली असल्याने नागरीकामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.याबाबत वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राचन्नावाडी येथील सुर्यकांत राजाराम चिंचोळे व बालाजी भंडे या दोघांच्या घराचे कुलुप तोडून कपाटाचे लॉक मोडून चोरट्यांनी कानातील झुमके , बोरमाळ, मनी, सोन्याची साखळी , अंगठी, चांदीचे शिक्के, वाळे असे दहा तोळे सोने व एक किलो चांदी आणि 95 हजारांची रोकड चोरली. तसेच संपत मलिशे यांच्या घराचे कुलुप तोडले,गणपत चिंचोळे यांच्या घरातील कपाटाचे लॉक तोडले व घरातील साहित्य अस्ताव्यस्त टाकले,अरविंद आवाळे यांचा दरवाजा तोडून कपाटाचे लॉक तोडून साड्या व इतर साहित्य टाकून घराला बाहेरून कडी लावली.गावातील किराणा दुकान फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला.एकाच रात्री अशी सहा घरे चोरट्या टोळीने फोडली असल्याने राचन्नावाडी व परीसरातील नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राचन्नावाडी येथे दीड महिन्यापुर्वीच चोरट्यांनी तातेराव वागलगावे यांचे घर फोडून दोन तोळे सोने व 50 हजार रुपये लंपास केले होते.त्याच दिवशी इतर दोघांची घरे फोडण्याचाही प्रयत्न केला होता.ती घटना विसरी जात नाही तोपर्यंत चोरट्यांनी ही दुसरी धाडसी चोरी केली आहे. घटनेची माहिती मिळताच वाढवणा पोलिसांनी पंचनामा करून ठसे तज्ञांना बोलावून गुन्हा दाखल केला आहे.
नागरीकांनी मौल्यवान वस्तू व रोख रक्कम बॅंकेत ठेवाव्यात – पोलिसांचे आवाहन
=====================
नागरीकांनी सतर्क राहून स्वतःचे नुकसान टाळावे. मौल्यवान वस्तू, रोख रक्कम बॅंकेत ठेवावेत. संशयास्पद व्यक्तीची पोलिसांना तात्काळ माहिती दिली तर होणारी दुर्घटना टाळता येते. घर उघडे ठेवून झोपू नये, रात्री घरातील व्यक्तींनी शेतीकडे न जाता घरीच रहावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक बी.एस.गायकवाड यांनी केले आहे.


