आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चाकूरातील मातृ शक्तिस्थळाला भाविकांची गर्दी

आईच्या स्मरणार्थ उभारले माय मंदिर,मंदिरात केली जाते नित्यनियमने पुजा, आराधना

चाकूर : (मधुकर कांबळे )
लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जन्मदात्या आईच्या निधनानंतर तिच्या मुलांनी माय मंदिर बांधून समाजासमोर मातृभक्तीचा आदर्श निर्माण केला आहे. हे माय मंदिर पाहण्यासाठी व दर्शनासाठी दूरदूरहून नागरिक मोठया प्रमाणात येत आहेत. येणाऱ्या भाविकांसाठी चहा पाणी, नाश्त्याची व्यवस्था सोनटक्के परिवाराच्या वतीने कऱण्यात येत आहे.त्यामुळे या स्तुत्य कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
        आईची महिमा फार मोठी असून प्रत्येक माणसांच्या जडणघडणेत आईची मोलाची भूमिका असते. आई हा दोन अक्षरांचा मिळून बनलेला शब्द आहे.आ म्हणजे आत्मा व ई म्हणजे ईश्वर.म्हणजेच जिच्या आत्म्यात प्रत्यक्ष ईश्वर असतो ती माता किंवा आई असते.अशाच आपल्या आईला सदैव स्मरणात ठेवण्यासाठी चाकूरात सोनटक्के परिवाराने मातृ शक्तिस्थळ उभारले आहे. हे निश्चित सर्वासाठी प्रेरणादायी आहे.
आज आपल्या सभोवताली मोठ्या प्रमाणात वृद्धाश्रमांची संख्या वाढताना दिसत आहे.आई-वडील निराश्रितपणे जगताना दिसत आहेत. तेव्हा कुठेतरी ‘अंधार फार झाला’ असे वाटू लागते, तेव्हाचं कुठेतरी मातृ शक्तिस्थळ सारखी पणती ही लुकलुकताना दिसते. आणि याच पणतीतील तेजोमय प्रकाश हाच आशेचा किरण समाजासाठी आशादायी ठरणारा वाटत आहे.
संस्कार – उपदेश आणि योग्य दिशा ही केवळ आई कडूनच मिळते. छत्रपती शिवाजी महाराज माता जिजाऊ मुळेच घडले. हा इतिहास आपणास माहीत आहे.तर महाराष्ट्राला साने गुरुजी सारखा महान लेखक केवळ आई मुळेच मिळाला. कित्येक महापुरुषांनी आपल्या जडणघडणीत केवळ आईचं सर्वस्व असल्याचे सांगितले आहे. श्रावण बाळाची आणि भक्त पुंडलिकाची गोडवे गाणारी आपली संस्कृती आज आईला विसरत चालली आहे. फ्लॅट संस्कृती आणि आयुष्यातील स्पर्धां यामुळे कुटुंब मर्यादीत झाले आहेत. मी, माझी बायको व मुलं एवढचं कुटुंब झालं आहे.अशा परिस्थितीमध्ये काही लोकांच्या कुटुंबात आईचे स्थान देवा पेक्षाही श्रेष्ठ असल्याची प्रचिती पहावयास मिळते. आणि जे कोणी आई वडीलांना विसरतात त्यांच्यासाठी तर विचार करावायस लावणारे हे मंदिर आहे.
           आई व्यक्ती नसून ती संस्काराची खान असते. परमेश्वराला प्रत्येकाच्या सोबत येता येत नाही म्हणून त्यांनी आपले स्वतःचे एक रूप आई द्वारे प्रत्येका सोबत पाठवले आहे. अशा आईसाठी जगणारे अनेकजण पहावयास मिळतात. असेच एक कुटुंब लातूर जिल्ह्यातील चाकूर शहरात आहे. स्वातंत्र्य सेनानी बळीराम सोनटक्के यांच्या कुटुंबात मातृशक्तीचे स्थान सर्वश्रेष्ठ असल्याचे सर्वदूर परिचित आहे. त्यांच्या कुटुंबातील काशीबाई यांना सर्व सोनटक्के कुटुंबीय देवा स्वरूप मानतात. त्यांच्या दातृत्वाची महती मोठी आहे. तहानलेल्यांना पाणी आणि भुकेल्यांना अन्न, मायने देणे हीच काशीबाई सोनटक्के यांची संपत्ती होती. त्यांच्या स्मृती कायमस्वरूपी जतन करण्यासाठी चाकूर शहरात ‘मातृ शक्तिस्थळ’ निर्माण करण्यात आले असून त्यामुळे सर्वांच्या मातृ स्मृती जाग्या होत आहेत. काशीबाई यांच्या विषयी संपूर्ण परिसर अतिशय आदराने बोलतो. स्वातंत्र्य सैनिक असलेल्या बळीराम सोनटक्के यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांचे जीवन बदलून गेले. स्वतःच्या संसारा सोबत राष्ट्राच्या संसाराची घडी बसवण्यासाठी भूमिगत असणारे कित्येक स्वातंत्र्य सैनिकांना भाजी भाकरी खाऊ घातली. अनेक गुप्त बैठकींच्या त्या साक्षीदार होत्या. आज देहाने त्या नसल्या तरी स्वातंत्र्य सैनिक बळीराम सोनटक्के या निखाऱ्यासोबत हळुवारपणे संसार करून त्यांनी आपले नाव अजरामर केले आहे.
अतिशय सुंदर, दिमाखदार, रेखीव व देखणे मंदिराचे बांधकाम करण्यात आले असून रस्त्यालगत उभारण्यात आलेली दिव्य भव्य माय मंदिर नावाची कमान येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत असल्याचे दिसून येते.

आई वडीलांनी केलेल्या संस्कारातून, कर्तुत्वाने, दातृत्वने माझ्यासाठी माझी माय जीवंत आहे. त्यांनी दिलेली शिदोरी आयुष्यभर पुरून उरणारी आहे. आम्ही मंदिरात नित्यनियमने पुजा, आराधना करत असतो. मी आईला नैवद्य दाखवल्याशिवाय अन्न पाणी सेवन करत नाही.
=====================
शिवकुमार सोनटक्के, (मुलगा)
राष्ट्रीय खेळाडू, बॉलबॅडमिंटन

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??