कोणत्याही स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी जिद्द आणि ध्येयनिश्चिती महत्वाची – प्रा. सुधीर पोतदार यांचे प्रतिपादन

चाकूर : 22 फेब्रुवारी / मधुकर कांबळे
जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आज स्पर्धा वाढत आहे. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर मनी जिद्द असली पाहिजे. त्यासाठी ध्येयनिश्चिती केली पाहिजे,कारण ध्येयाशिवाय कोणतेही यश मिळत नाही असे प्रतिपादन लातूर येथील ज्ञानप्रबोधिनी स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा.सुधीर पोतदार यांनी केले.
तालुक्यातील महाळंग्रा येथील दिनेश बेंबडे फार्मसी महाविद्यालयात आयोजित केलेल्या,व्यक्तिमत्व विकास व करिअर मार्गदर्शन कार्यशाळेत ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधेय चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष दिनेश बेंबडे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव प्रणिता बेंबडे,कोषाध्यक्ष विवेक बेंबडे,प्राचार्य डॉ.जयदीप यादव,प्रशासकीय अधिकारी प्रा.श्रीहरी वेदपाठक उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.पोतदार म्हणाले की विद्यार्थ्यांनी यशाबरोबरोच आपले व्यक्तिमत्व चांगले घडविण्याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायला हवे.अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे आहे.आज सोशल मिडीयाचा वापर अधिक प्रमाणात होत असल्याने आपल्या शरीरातील न्यूरॉन्स वेगाने नष्ट होत आहेत.परिणामी शरिरातील उष्णतेच्या पातळीत वाढ झाल्याने अपचनाचे विकारही वाढले आहेत.त्यातून चिडचिडेपणा वाढला आहे.मनाविरुद्ध ऐकण्याची क्षमता खालावली आहे.त्यामुळे तरुण वर्गात निराशा,नकारात्मकता ठळकपणे दिसून येत आहे.त्यामुळेच मन एकाग्र होत नाही.आपण एक तासांपेक्षा अधिक वेळ स्थिर राहू शकत नाही.यासाठी स्क्रीन टाईम वरचेवर कमी केला पाहिजे.स्वामी विवेकानंद हे एकपाठी होते.त्यांच्या वाचनाचाही वेग प्रचंड होता.त्यांचे चरित्र आपण अभ्यासले पाहिजे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तर दिवस-रात्रीचा विचार न करता,तहानभूक विसरुन ग्रंथालयातच अभ्यास केला.याचे स्मरण आपण ठेवले पाहिजे.त्याचबरोबर आई वडीलांच्या कष्टाची जाण ठेवूनच वर्तन केले पाहिजे.जीवनात कधीही चुकीची संगत करु नका.स्वत:चा स्वाभिमान नेहमी जागृत ठेवा.कोणत्याही क्षेत्रात करिअर करण्याठी त्या क्षेत्राचा अभ्यास करुनच पुढे जाणे आवश्यक आहे.इतरापेक्षा माझ्यात वेगळ्याच कोणत्या क्षमता आहेत,यांचा शोध घेतल्यास यश मिळणे कठीण नाही.त्यासाठी प्रत्येक दिवसागणिक आपले ज्ञान वाढवण्यासाठी पर्यत्नशील रहायला हवे,असे आवाहन प्रा.पोतदार यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.श्रीहरी वेदपाठक यांनी तर आभार प्राचार्य डॉ.जयदीप यादव यांनी मानले.कार्यक्रमासाठी विद्यार्थी,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.


