चाकूर नगरपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारामुळे शव वाहिनीच्या प्रकाशात केले अंत्यसंस्कार

चाकूर : 11 सप्टेंबर /मधुकर कांबळे
चाकूर नगरपंचायतीच्या दुर्लक्षित कारभारमुळे स्मशानभूमीतील सर्वच विद्युत दिवे बंद असल्याने चक्क शव वाहिनीच्या प्रकाशात अंत्यसंस्कार करण्याची विदारक घटना बुधवार दि. 11 सप्टेंबर 2024 रोजी घडलेली पहावयास मिळाली असून त्यामुळे चाकूर नगरपंचायतच्या ‘अ’ कार्यक्षमते विषयी प्रश्न निर्माण होत आहेत.
लातूर जिल्ह्यातील अतिशय दिव्य – भव्य,स्वच्छ आणि विविध झाडांनी भरलेली सुंदर व रमनीय अशी स्मशानभूमी म्हणून चाकूरच्या स्मशानभूमीची सर्वदूर ओळख असली तरी आजमीतीला या स्मशानभूमीत अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले आहे.त्यामुळे रात्रीच्यावेळी अंत्यसंस्कार करताना अंत्यविधीसाठी आलेल्या मंडळीना मोठी कसरत करावी लागत असल्याचे पहावयास मिळाले.
बुधवार दि. 11 सप्टेंबर रोजी सिद्धार्थ नगर येथील सेवानिवृत्त शिक्षक यांचा अंत्यविधी रात्री चाकूर येथील स्मशानभूमीत करण्यात आला.यावेळी स्मशानभूमीतील सर्व विद्युत पोलवरील सर्वच्या सर्व दिवे बंद असल्याने अंत्यसंस्कार करण्यासाठी शव वाहिनी व मोबाईल बॅटरीच्या प्रकाशाचा आधार घेत अंत्यविधी करावी लागल्याची विदारक अशी दुर्दैवी पाळी नातेवाईकावर आली असल्याने उपस्थित असलेल्या मंडळीतून नगरपंचायतच्या कारभाराविषयी संताप व्यक्त केला जात होता.
यामुळे विकासाच्या नावाखाली अनेक लोकप्रतिनिधी वीजेलाच प्राधान्य देत असले तरी समशानभूमीकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. मागील बऱ्याच दिवसापासून या ठिकाणची दिवे बंद असल्याचेही काहीजण बोलत होते.
प्रत्येक वर्षी लाखो रुपयांचा चुरडा विद्युत पोल उभा करणे व दिवे लावण्यावर करणारे लोकप्रतिनिधी हे स्मशानभूमीशी काहीच देणेघेणे नाही असे जर वागत असले तरी मुख्याधिकारी यांनी तरी स्मशानभूमीकडे लक्ष द्यावे अशी माफक अपेक्षा अंत्यविधीसाठी आलेल्या नागरिकांतून केली जात आहे.तूर्त तरी अंत्यविधीच्यावेळी नगरपंचायतीच्याच कारभाराविषयी उलट सुलट चर्चा उपस्थितातून ऐकावयास मिळत होती.


