शेतकऱ्याच्या फोनची सहकारमंत्री ना.पाटील यांनी घेतली दखल,चाकूर कृषी कार्यालयाला दिली ताबडतोब भेट.
तालुका कृषी अधिकारी यांच्या सह सात कर्मचारी अनुपस्थित : जिल्हाधिकारी, कृषी उपसंचालकांना दिले कारवाईचे निर्देश.

चाकूर : 18 सप्टेंबर (मधुकर कांबळे )
चाकूर येथील कृषी कार्यालयात कामानिमित्त आलेल्या एका शेतकऱ्यांने कार्यालयात तालुका कृषी अधिकारी यांच्यासह बरेच कर्मचारी आले नाहीत. असाच प्रकार नेहमीच होत असल्यामुळे कामास नेहमीच उशीर व अडवणूक होत असल्याची फोनवरून तक्रारवजा माहिती राज्याचे सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांना दिली असता या शेतकऱ्यांच्या फोनवरील तक्रारीची दखल घेऊन सहकार मंत्री ना. पाटील यांनी ताबडतोब कृषी कार्यालयाला भेट देऊन या कार्यालयात गैरहजर असलेल्या कृषी अधिकारी यांच्या सह सात कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश लातूरच्या जिल्हाधिकारी व कृषी उपसंचालकांना दिले आहेत.
चाकूर येथील तालुका कृषी कार्यालयाच्या वारंवार तक्रारी सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांना तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यात आज गुरुवार दि.18 सप्टेंबर 2025 रोजी काही शेतकरी कामानिमित्त कृषी कार्यालयात आले असता तालुका कृषी अधिकारी नसल्याने त्यातील एका शेतकऱ्यांने थेट सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांना फोनवरून माहिती दिली. ना. पाटील एका कार्यक्रमानिमित्त चाकूर येथे येत असतानाच ही माहिती मिळाल्याने मंत्री महोदयांनी आपला ताफा थेट कृषी कार्यालयाकडे वळविला . त्यावेळी 10 पैकी तीनच कर्मचारी कार्यालयात असल्याचे ना. पाटील यांच्या निदर्शनास आले.याठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांनी या कार्यालयातील अधिकारी शेतकऱ्यांची कशी अडवणूक करतात व सतत येथील अधिकारी गैरहजर राहत असल्याची माहिती ना. पाटील यांना दिली. तालुका कृषी अधिकारी यांच्यासह अनेक कर्मचारी गैरहजर असल्याचे दिसून आले. यामुळे सहकार मंत्री ना. पाटील यांनी लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी व कृषी विभागाचे उपसंचालक यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले तसेच तहसीलदार नरसिंग जाधव यांना तालुका कृषी अधिकारी व अन्य कर्मचारी गैरहजर असल्याचा पंचनामा करून वरिष्ठांना कळविण्याचे निर्देश दिले.
चाकूर येथील कृषी कार्यालय हे दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर असल्यामुळे तालुक्यातील नागरिकांची गैरसोय होत असून ते खालच्या मजल्यावर स्थलांतरित करावे असेही निर्देश सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी कृषी उपसंचालकांना दिले आहेत.


