सहकार मंत्री ना. बाबासाहेब पाटील यांनी केली नळेगाव भागातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

चाकूर : 26 सप्टेंबर (मधुकर कांबळे )
राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांनी गुरुवार दि.25 सप्टेंबर रोजी चाकूर तालुक्यातील नळेगाव भागातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली.
यावेळी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतीचे पंचनामे करून मदत करण्याचे निर्देश सहकार मंत्र्यानी प्रशासनास दिले. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत, माती वाहून गेली आहे अशा सर्व शेतकऱ्यांचे वेगळेपणाने पंचनामे करून त्याचा स्वतंत्र अहवाल शासनाकडे सादर करावा असे निर्देशही ना. पाटील यांनी दिले. चाकूर तालुक्याला 29 कोटी रुपये अनुदान निधी प्राप्त झाला असून लवकरात लवकर निधी वितरण करण्याचे निर्देश सहकार मंत्र्यांनी प्रशासनाला दिले. तसेच 29 ऑगस्ट नंतर पडलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश सुद्धा सहकार मंत्री ना. पाटील यांनी दिले आहेत.अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान अतोनात झाले असून सरसकट शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे ना. पाटील यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीना सांगितले. तसेच त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी ना. पाटील यांच्यासमवेत अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे, तहसीलदार नरसिंग जाधव, गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता सुरज गौंड, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे विभागीय अभियंता सुभाष कुलकर्णी, नळेगावचे सरपंच कांतराव चव्हाण, यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.


