नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी पन्नास हजार रूपयाचे अनुदान द्यावे – माजी राज्यमंत्री बच्चु कडू

चाकूर : 29 सप्टेंबर /प्रतिनिधी
राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारने हेक्टरी पन्नास हजार रूपयाचे अनुदान द्यावे असे प्रतिपादन प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चु कडू यांनी केले .
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा या प्रमुख मागणीसाठी बच्चु कडू यांच्यावतीने राज्यभर शेतकरी – शेतमजुर हक्क यात्रेचे आयोजन करण्यात आले असून त्यानिमित्ताने चाकूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये जाहीर सभेचे आयोजन शनिवार दि.27 सप्टेंबर 2025 रोजी करण्यात आले होते. त्यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी खा. डाॅ. शिवाजी काळगे, माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळूंके, नगरसेवक मिलींद महालिंगे,प्रहारचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चौगुले, खदीर शेख, रियाज पठाण यांची उपस्थिती होती.
आपल्या भाषणात पुढे बोलताना बच्चु कडू म्हणाले की, शेतकरी आणि शेतमजुरांशिवाय देशाचा विकास शक्य नाही.सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत दयावी, दिवाळीपर्यंत आर्थिक मदत नाही दिल्यास राज्य सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल असा इशाराही बच्चू कडू यांनी दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रहार जनशक्ती पक्षाचे तालूकाध्यक्ष वर्धमान कांबळे यांनी केले. या सभेस चाकूर व परिसरातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.


