चाकूर तालूक्यातील अजनसोंडा गण ठरणार पावरफुल
चापोली, नळेगाव, सुगाव गण खुल्या प्रवर्गासाठी राखीव

चाकूर : 13 ऑक्टोबर (मधुकर कांबळे )
चाकूर तालुक्यातील पंचायत समितीच्या दहा गणाच्या सार्वत्रीक निवडणुकीसाठी सोमवार दि.13 ऑक्टोबर रोजी सोडत पध्दतीने आरक्षण काढण्यात आले.यात चापोली, नळेगाव, सुगाव हे तीन गण खुल्या प्रवर्गासाठी सुटले असल्यामुळे इच्छुकांची या गणात चुरस निर्माण होणार असली तरी सभापती पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलासाठी राखीव असल्यामुळे खऱ्या अर्थाने अजनसोंडा गण राजकीयदृष्ट्या पावरफुल ठरणार आहे.
पंचायत समिती कार्यालयाच्या सभागृहात रोहयोच्या उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली.यावेळी तहसीलदार नरसिंग जाधव, गटविकास अधिकारी संतोष वंगवाडे, नायब तहसीलदार संतोष धाराशिवकर यांची उपस्थिती होती. यात 2011च्या जणगणनेनुसार अनुसुचित जातीची सर्वांधिक लोकसंख्या असलेले वडवळ नागनाथ व आटोळा हे दोन गण अनुसुचित जातीसाठी आरक्षीत करण्यात आले. यात महिलेसाठी चिठ्ठी काढण्यात आल्यानंतर वडवळ नागनाथ हा गण महिलेसाठी आरक्षीत झाला आहे. उर्वरीत आरक्षणात नागरिकांचा मागास प्रवर्ग – जानवळ, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) – अजनसोंडा (बु), खुला प्रवर्ग महिला – झरी (बु), आष्टा, रोहिणा, खुला प्रवर्ग – नळेगाव, चापोली, सुगाव हे गण सोडत पध्दतीने आरक्षीत झाले आहेत. अक्षय तेलंग या लहान बालकांच्या हस्ते आरक्षण सोडतीच्या चिठ्य़ा काढण्यात आल्या.या सोडत कार्यक्रमासाठी सहाय्यक महसुल अधिकारी डी. एम. मद्दे, बालाजी इंगळे, अंगद कासले, विलास क्षीरसागर यांनी सहकार्य केले. गण आणि सभापती पदाचे आरक्षण जाहिर झाले असून प्रत्यक्ष निवडणूकीच्या तारखा कधी जाहीर होणार याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
चाकूर तालुक्यातील जिल्हा परिषद गट आरक्षण
==================
रोहिणा – अनुसूचित जाती महिला, चापोली – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला,जानवळ व वडवळ (नाग.) – नागरिकांचा मागास प्रवर्ग,तर नळेगाव – सर्वसाधारण


