अशी ही पंचाईत…..

अशी ही पंचाईत….
================================
आज राजकारण हा बहुतांशी लोकांचा आवडता आणि जिव्हाळ्याचा विषय बनला असून चमत्कारिक व अजब रसायन म्हणून राजकारणाकडे पाहिले जात आहे. पूर्वी सामाजिक बांधिलकी जोपासत राजकारण केले जात असे.परंतु आज समाजासाठी राजकीय चळवळ करण्याचे दिवस इतिहास जमा होत असून स्वार्थासाठी वळवळ करण्याचे स्वार्थांद दिवस सध्या राजकारणात झपाट्याने फोफावत असल्याचे विदारचित्र स्पष्ट दिसत आहे. त्याला कारण मतलबी राजकीय मंडळी.
आपल्या देशातील बहुतांशी सर्वच नेते मंडळी 20 टक्के राजकारण व 80 टक्के समाजकारण करीत असत. मात्र आज त्यात अमूलाग्र बदल झाला असून काही मंडळीनी सामाजिक बांधिलकीची बंधने राजरोसपणे झुगारून 100 टक्के राजकारण करण्याचा विडाच उचलेला दिसत आहे. राजकारण हे समाजोपयोगी नाही तर स्वार्थासाठी केली जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राजकारणातील विश्वासहर्ता दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.
मागील आठवड्यात चाकूर तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकी संदर्भात एका राष्ट्रीय पक्षाची बैठक नुकतीच पार पडली. बैठकीसाठी तालुक्यातील त्या पक्षाचे बहुतांशी सर्वच नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यात जरी महायुतीचे सरकार असले तरी आपण स्थानिक पातळीवर कोणाशीही युती करायची नाही विचार या बैठकीमध्ये मांडण्यात आला आणि या ठरावाला अनेकांनी पाठिंबा दिला.एकमुखाने या ठरावाला मंजुरी देण्यात आली आणि मंजुरीसाठी प्रदेश कार्यकारणीकडे पाठविण्याचे निश्चित झाले.त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ‘अकेले चलो ‘ ची भूमिका बैठकीत निश्चित करण्यात आली.स्वबळावर निवडणुका लढवयाच्या आणि त्या जिंकायच्या असा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
मात्र याच बैठकीत एका गटातील कार्यकर्त्यांनी आपले परखड विचार व्यक्त करून अनेकांची झोप उडवली. निवडणुका स्वबळावर जरूर लढवा पण निवडणुकीत स्थानिकचाच उमेदवार द्या.बाहेरचा उमेदवार गटात किंवा गणात लादू नका असा विचार मांडताच टाळ्यांनी या मागणीला अनेकानी पाठिंबा दर्शवीला. मात्र बैठकीतील अनेकांचे चेहरे पडले गेले.कारण आरक्षण जाहीर झाल्यापासून अनेकांनी विविध गटातून निवडणूकीसाठी सुरक्षित मतदार संघ कोणता राहील याची चाचपणी सुरू केली होती. पण पक्षातूनच दुसऱ्या गटात निवडणुका लढवू नये असा सूर निघत असेल तर निवडणुकीत आपले कसे होणार ? पक्षश्रेष्टीने हाच फार्मुला वापरला तर उमेदवारी कशी मिळणार ? मेरे अंगणे में तुम्हारा क्या काम है असे जर दुसऱ्या गटातील मतदार बोलू लागले तर कसे होणार ?असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत असल्याने अशा हौशी व गुडघ्याला बाशिंग बांधून दुसऱ्या गटात निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांची मोठी पंचाईत निर्माण होणार आहे.
तूर्ततरी या बैठकीमध्ये दुसऱ्या गटातील उमेदवार कुणी स्वीकारणार नाही.स्थानिकांनाच संधी द्यावी. या कार्यकर्त्यांच्या ठाम व वास्तववादी भूमिकेमुळे इच्छुक उमेदवारांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्याच व स्व पक्षाच्याच बैठकीत असे ऐकावयास मिळाल्याने अनेक दुसऱ्या गटात इच्छुक असणाऱ्या हौशी उमेदवारांची येणाऱ्या काळात उमेदवारीसाठी मात्र पंचाईत होणार हे मात्र खरे !

