पत्रकार संजय पाटील व शिवशंकर टाक यांना उदगीर तालुका पत्रकार संघाचे मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्कार जाहीर
पाटील यांना उत्कृष्ट वार्ता गटातून प्रथम तर टाक यांना तृतीय पुरस्कार

चाकूर : 8 जानेवारी / मधुकर कांबळे
उदगीर तालुका पत्रकार संघाच्यावतीने दिल्या जाणाऱ्या मराठवाडास्तरीय पत्रकारिता पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून उत्कृष्ट वार्ता गटातून चाकूर येथील पत्रकार संजय पाटील यांना प्रथम तर वडवळ नागनाथ येथील शिवशंकर टाक यांना तृतीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
उदगीर तालुका पत्रकार संघाच्या वतीने मागील पंधरा वर्षापासून मराठवाडास्तरीय उत्कृष्ठ वार्ता, शोध वार्ता या दोन गटात पुरस्कार दिले जातात. यंदा जाहीर झालेल्या पुरस्कारात उत्कृष्ट वार्ता गटातून प्रथम पुरस्कार चाकूर येथील दैनिक नवराष्ट्रचे तालुका प्रतिनिधी संजय पाटील यांच्या “आईच्या प्रेमापोटी तीन मुलांनी बांधले मंदिर ” या बातमीस अर्जुन मुद्दा यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.महादप्पा मुद्दा यांच्या स्मरणार्थ रोख पाच हजार रुपये, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.तृतीय पुरस्कार वडवळ नागनाथ येथील पुण्यनगरीचे प्रतिनिधी शिवशंकर टाक यांना ” गाव हागणदारी मुक्त होइना, हातातले टमरेल काही जाईना ” या बातमीस प्रा. प्रशांत अपसिंगेकर यांच्यावतीने जेष्ठ पत्रकार कै.अनंत अपसिंगेकर यांच्या स्मरणार्थ दोन हजार रुपये रोख, सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र. देऊन सन्मानित केले जाणार आहे.
तसेच उत्कृष्ट वार्ता गटातून द्वितीय पुरस्कार अंबादास जाधव (उमरगा जि. धाराशिव) यांना जाहीर झाला आहे.तर शोधवार्ता गटातून प्रथम पुरस्कार रवींद्र सोनवणे (सिल्लोड), द्वितीय पुरस्कार संगम डोंगरे (जळकोट), तृतीय पुरस्कार बाबासाहेब उमाटे (देवणी) यांना जाहीर झाला आहे. तर ज्येष्ठ पत्रकार रामराव गवळी यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा लवकरच मान्यवरांच्या हस्ते होणार असल्याचे उदगीर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष राम मोतीपवळे, कार्याध्यक्ष ॲड.एल.पी.उगीले,स्पर्धा सयोंजक प्रा.प्रविण जाहुरे,व्यंकट नेत्रगावकर यांनी कळविले आहे.


