आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

आ.बाबासाहेब पाटील यांनी इतिहास रचला , अहमदपूर मतदार संघात 1985 नंतर सलग दुसऱ्यांदा आमदार होण्याचा मिळविला मान

तिरंगी लढतीत प्रतिस्पर्धी दोन्ही उमेदवारांवर मात करीत विजय खेचून आणला

चाकूर : 23 नोव्हेंबर / मधुकर कांबळे
अतिशय अटीतटीच्या तिरंगी झालेल्या निवडणुकीत अहमदपूरचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विनायकराव पाटील व जनसुराज्य पक्षाचे उमेदवार गणेश हाके यांच्यावर मात करीत मोठ्या फरकाने विजयश्री खेचून आणली आहे.त्यातच शेकापचे स्व.भाई किशनराव देशमुख यांच्यानंतर सलग दोन वेळा आमदार होण्याचा मानही आमदार पाटील यांना मिळाला असून यामुळे मतदारसंघात आ. पाटील यांनी नवीन इतिहास रचला आहे.
अहमदपूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी सकाळी आठ वाजल्यापासून अहमदपूर येथील डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पार पडली. मतमोजणीत पहिल्या काही फेरीत गणेश हाके यांनी आघाडी घेतली होती. मात्र आठव्या फेरीपासून बाबासाहेब पाटील यांनी निर्णायक आघाडी घेत शेवटपर्यंत ही आघाडी टिकवून ठेवत 31 हजार 685 मताची आघाडी घेत विजयश्री खेचून आणली आहे. 27 व्या फेरी अखेर बाबासाहेब पाटील यांना 95 हजार 777 मते मिळाली .त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अहमदपूरच्या उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांनी पाटील यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले.
यापूर्वी 1972 ते 1985 पर्यंत शेकापचे स्व. भाई किशनराव देशमुख यांनी या मतदारसंघाचे तीनदा नेतृत्व केले असून पुलोद सरकारमध्ये त्यांनी महसूल राज्यमंत्रीपद सांभाळले होते.त्यानंतर 1985 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे रामचंद्र पाटील हे आमदार झाले. 1990 साली बाळासाहेब जाधव यांनी काँग्रेसकडून अहमदपूर विधानसभेचे आमदार म्हणून नेतृत्व केले.ते उदगीर मतदारसंघात दोनदा विजय मिळवून महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळात राज्यमंत्री होते.1995 साली भाजपने भगवानराव नागरगोजे यांना निवडणूकीत उतरवून भाजपचा पहिला आमदार विधानसभेत पाठविला.तर 1999 साली विनायकराव पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवीत ते पहिल्यांदाच आमदार झाले. व राज्यमंत्रीही झाले.पुन्हा भाजपने 2004 साली बब्रुवान खंदाडे यांना उमेदवारी दिली. त्यावेळी बब्रुवान खंदाडे हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयी झाले.2009 साली विनायकराव पाटील यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या तिकीटावर निवडणूक लढविली तर भाजपा आणि शिवसेना यांच्याकडून माजी आमदार बब्रुवान खंदाडे यांनी निवडणूक लढवली होती.याच निवडणुकीत बाबासाहेब पाटील यांनी रिडालोसमध्ये सहभागी घटक पक्ष असलेल्या रासपकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवून ती निवडणूक त्यांनी जिंकली.2014 साली पुन्हा विनायकराव पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढविली आणि जिंकली . 1919 साली अहमदपूर चाकूर विधानसभेचे राजकीय चित्र बदललेले पहायला मिळाले.विनायकराव पाटील यांनी भाजपा आणि शिवसेना महायुतीतून तर बाबासाहेब पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविली.निवडणुकीत बाबासाहेब पाटील यांचा 30 हजार मताधिक्याने विजय झाला होता.यावरून 1985 नंतर सलग दुसऱ्यांदा आमदार होणे नाही ही अलिखित परंपराच सुरु झाली होती. परंतु तब्ब्ल 39 वर्षानंतर आ. पाटील यांनी सलग दुसऱ्यांदा आणि पूर्वीपेक्षा अधिक मताधिक्य घेत ही परंपरा मोडीत काढली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??