विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे – नरेश पाटील चाकूरकर

चाकूर : 16 फेब्रुवारी / मधुकर कांबळे
दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे.दहावीनंतर आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करावे .जेणेकरून आपले पुढील आयुष्य आनंदात जगता येईल.असे मौलिक प्रतिपादन जगत जागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव नरेश पाटील चाकूरकर यांनी केले.
जगत जागृती विद्यालयातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि बक्षीस वितरण समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सर्वोत्तमराव कुलकर्णी हे होते तर प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष अर्जुन मद्रेवार, सहसचिव बाबुराव बिडवे ,कोषाध्यक्ष धोंडीराम तोंडारे, संस्थेचे सदस्य ॲड.विक्रम पाटील चाकूरकर ,शिवप्रसाद शेटे, विठ्ठलराव सोनटक्के, मुख्याध्यापिका सविता स्वामी, प्राथमिकचे मुख्याध्यापक महादेव काळोजी, पर्यवेक्षक प्रदीप उस्तुर्गे, ज्येष्ठ अध्यापक संजय नारागुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आपल्या भाषणात पुढे बोलताना पाटील म्हणाले की जगत् जागृती संकुलामध्ये फक्त गुणवंत विद्यार्थी घडावे असे नाही तर आत्मविश्वासाने परिपूर्ण असे भावी नागरिक घडावेत म्हणून येथील शिक्षक अहोरात्र प्रयत्न करत असतात.त्यांच्यामुळेच आज सर्व क्षेत्रात या विद्यालयातील विद्यार्थी कार्यरत असलेले पाहावयास मिळत आहेत.
याच कार्यक्रमात विद्यालयातील आदर्श विद्यार्थी पुरस्कार संकर्ष संगमेश्वर पाटील आणि उत्कृष्ट वर्ग म्हणून इयत्ता आठवी ब तसेच विद्यालयातील उपस्थितीच्या बाबतीत आदर्श वर्ग म्हणून इयत्ता नववी ब च्या विद्यार्थ्यांना संस्थेचे उपाध्यक्ष अर्जुन मद्रेवार यांच्यावतीने एक हजार रुपयाचे पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यासह क्रीडा विभाग, सांस्कृतिक विभाग, बाह्य परीक्षा विभाग, विज्ञान विभाग, चित्रकला विभाग ,परिपाठ विभाग, एनसीसी विभाग आणि स्काऊट गाईडचे विरांगणा गाईड पथक आणि चंद्रशेखर आझाद पथक यांना पारितोषिके देऊन विद्यालयाच्यावतीने मान्यवराच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी अफान शेख , स्नेहल जोशी , आयेशा शेख ,प्राजक्ता पुंडकरे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सविता स्वामी आणि पर्यवेक्षक प्रदीप उस्तुर्गे यांनी केले.सुत्रसंचलन राजकुमार कदम यांनी केले तर आभारप्रदर्शन राजू पिटलावार आणि बिपिन जिरगे यांनी व्यक्त केले.कार्यक्रमास विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
डॉ. उमाकांत चलवदे यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार
===================
विद्यालयातील विज्ञान विषयाचे जेष्ठ शिक्षक उमाकांत चलवदे यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडची उच्च विद्याभूषित पीएचडी ही पदवी प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे सचिव नरेश पाटील चाकूरकर यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
डॉ. उमाकांत चलवदे यांचा पाटील यांच्या हस्ते सत्कार



