चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाला नॅकचा बी प्लस दर्जा

चाकूर : 6 ऑक्टोबर /मधुकर कांबळे
येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाला नॅकचा बी प्लस दर्जा मिळाला असून यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे,सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे शिक्षण क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.
महाविद्यालयाची गुणवत्ता टिकून रहावी म्हणून महाविद्यालयाचे मूल्यांकन नॅक समितीकडून केले जाते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सर्जेराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील विविध विभाग प्रमुख व सर्व कर्मचाऱ्यांनी नॅकसाठी मागील काही महिन्यापासून जय्यत तयारी केली होती.दि.26 व 27 सप्टेंबर 2024 या दोन दिवशी नॅक समितीकडून आलेल्या त्रीसदसीय समितीकडून महाविद्यालयाचे मूल्यांकन करण्यात आले. या समितीचे अध्यक्ष केरळ राज्यातील कन्नूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अब्दुल खादर,समन्वयक म्हणून जम्मू काश्मीर राज्यातील काश्मीर विद्यापीठाचे माजी प्रभारी कुलगुरू डॉ. ए. एम. शाह तर सदस्य म्हणून पश्चिम बंगाल राज्यातील राहारा येथील रामकृष्ण मिशन विवेकानंद शताब्दी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.कमलास्थानंद स्वामी हे होते.
या समितीने महाविद्यालयातील विविध विभागाची दोन दिवस सखोल तपासणी केली. त्याचबरोबर आजी – माजी विद्यार्थी, पालक यांच्याशीही समितीच्या सदस्यांनी सवांद साधला.

महाविद्यालयातील दस्तावेज, इमारत, परिसर, ग्रंथालय व विद्यार्थांनी सादर केलेला सांस्कृतिक कार्यक्रम पाहून समितीने समाधान व्यक्त केले.त्यांच्या शिफारशीवरून शुक्रवार दि.4 ऑक्टोबर 2024 रोजी नॅक समितीने बी प्लस दर्जा बहाल केला आहे.

महाविद्यालयाच्या या गुणात्मक यशामुळे लोकायत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सीमा देशमुख, संस्थेचे सचिव ॲड. प्रल्हादराव कदम , बाबासाहेब देशमुख,माजी विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी, पालक व शिक्षकप्रेमीनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सर्जेराव शिंदे , समन्वयक प्रा. डॉ. श्याम जाधव,प्रा. डॉ. मगदूम बिदरे, कार्यालय अधीक्षक ज्ञानोबा येमले यांच्यासह सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.


