आज आ.बाबासाहेब पाटील घेणार मंत्रिपदाची शपथ
तब्बल वीस वर्षांनी मिळाले चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघाला मंत्रिपद

चाकूर : 15 डिसेंबर /मधुकर कांबळे
चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघांचे कार्यसम्राट आमदार बाबासाहेब पाटील यांची राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून वर्णी लागली असून काल रात्री त्यांच्या नावावर शिकामोर्तब करण्यात आले.आज रविवार दि.15 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 4 वा.नागपूर येथील राजभवनावर आ. बाबासाहेब पाटील हे मंत्रिपदाची व गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.
आ.पाटील यांची मंत्रिमंडळात निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यांत आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून चाकूर व अहमदपूर शहरात आनंदोस्तव साजरा करण्यात आला.तब्ब्ल वीस वर्षांनी चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघाला आ. बाबासाहेब पाटील यांच्या रूपाने मंत्रिपद मिळाले आहे.
20 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या अतिशय अटीतटीच्या निवडणुकीत आ. बाबासाहेब पाटील यांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर मात करीत सलग दुसऱ्यांदा विजय प्राप्त केला असून त्यांनी शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार माजीमंत्री विनायकराव पाटील व जनसुराज्य पक्षाचे उमेदवार गणेश हाके यांचा पराभव केला आहे. यापूर्वी 2009 मध्ये बाबासाहेब पाटील यांनी रिडालोसच्या माध्यमातून पहिल्यांदा चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघांचे आमदार म्हणून विधान सभेमध्ये पाच वर्षे काम केले आहे.मागील दहा वर्षाचा आमदार म्हणून कामाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे व पुन्हा एकदा आमदार झाल्यामुळे आ.बाबासाहेब पाटील यांची निश्चितच मंत्रिमंडळ विस्तारात मंत्री म्हणून वर्णी लागणार असे निश्चित मानले जात होते.त्यावर काल अखेर शिकामोर्तब झाले.
यापूर्वी आ.पाटील यांनी लातूर जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष पद,जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्षपद भूषविले असून त्यांनी राज्य पणन महासंघांचे अध्यक्षपदही यशस्वीरित्या सांभाळले आहे. त्याचबरोबर कारखाना,बँका,शैक्षणिक संस्था चालविण्याचा त्यांना मोठा अनुभव आहे.तसेच आ.बाबासाहेब पाटील हे अजितदादा पवार यांचे अत्यंत निकटवर्ती व विश्वासू आमदार म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच मागील पाच वर्षात करोडो रुपयांचा विकास निधी आणून चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचे काम केले आहे.त्यामुळे अजितदादा पवार यांच्याकडून आ.बाबासाहेब पाटील यांना मंत्रिमंडळात मंत्री म्हणून स्थान मिळाले आहे.तब्ब्ल वीस वर्षानंतर चाकूर अहमदपूर विधानसभा मतदार संघाला आ. पाटील यांच्या रूपाने मंत्रिपद मिळाले असून यामुळे मतदार संघाचा सर्वांगीण विकास होणार हे मात्र निश्चित.
हल्लाबोल live वेबन्यूजच्या वतीने ना . बाबासाहेब पाटील यांचे मनस्वी अभिनंदन व पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा.
=====================================
आ.पाटील समर्थक शेकडो कार्यकर्ते नागपुरात दाखल
====================================
आ. बाबासाहेब पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याची बातमी समजताच आ. पाटील यांचे चाकूर व अहमदपूर तालुक्यातील शेकडो समर्थक कार्यकर्ते नागपूरला निघाले.आज अनेक कार्यकर्ते नागपुरात दाखल झाले असून काहीजण तर आ. पाटील यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे म्हणून मागील तीन दिवसापासून मुंबईत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रवादी काँगेसच्या वरिष्ठ नेत्यांना भेटण्यासाठी तळ ठोकून होते.


