अहमदपूरातील बंडखोरी रोखण्यात भाजप पक्षश्रेष्टींना यश येणार का ?

चाकूर : 2 नोव्हेंबर /मधुकर कांबळे
अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल 42 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून यामध्ये भाजपाच्या प्रमुख चार नेत्यांनी बंडखोरी करत उमेदवारी दाखल केली असल्यामुळे ही बंडखोरी रोखण्यास भाजप श्रेष्ठींना यश येणार का ? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी राज्यात भाजपा, शिवसेना (शिंदे गट )व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट )यांची महायुती असून काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट ) व शिवसेना (उद्धव ठाकरे गट ) यांची महाविकास आघाडी निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.
अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार बाबासाहेब पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. परंतु याच महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या भाजपाच्या माजी आमदार बब्रुवान खंदाडे,भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, लातूर जिल्हा महामंत्री भारत चामे,लातूर जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकूरकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
संपूर्ण राज्यामध्ये बंडखोरी केलेल्या उमेदवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न राज्य पातळीवरून सुरू झाला असून अहमदपूर विधानसभा मतदार संघातील उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या या भाजप नेत्यांना समजविण्यात व त्यांची बंडखोरी रोखण्यात भाजप पक्षश्रेष्ठी यशस्वी ठरणार का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्या तरी खंदाडे,हाके आणि पाटील यांनी आपापल्या कार्यकर्त्यांसमवेत प्रचार दौरा सुरु केला असल्याचे दिसून येत आहे.


