चाकूरात राजकीय भूकंप,नगराध्यक्षाविरूद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल
17 पैकी 14 नगरसेवकांच्या अविश्वास प्रस्तावावर सह्या

चाकूर : 14 मे / मधुकर कांबळे
चाकूरच्या राजकीय पटलावर मोठा राजकीय भूकंप झाला असून नगराध्यक्षाविरूद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. यामुळे चाकूरच्या राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

मंगळवार दि.13 मे रोजी चाकूर नगरपंचायतीच्या 14 नगरसेवकांनी नगराध्यक्ष कपिल माकणे यांच्या विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला असून माकणे यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
चाकूर नगरपंचायतमध्ये 17 नगरसेवक असून भाजपचे 03, प्रहारचे 06, राष्ट्रवादीचे 05 आणि कॉंग्रेसचे 03 नगरसेवक निवडून आले होते.त्यावेळी राजकीय खेळी करत प्रहारने भाजपच्या नगरसेवकांना सोबत घेऊन नगराध्यक्षपदी प्रहारचे कपील माकणे व उपनगराध्यक्षपदी भाजपचे अरविंद बिराजदार यांनी सत्ता स्थापन केली होती.तीन वर्षापेक्षा जास्त कालावधी उपनगराध्यक्ष म्हणून बिरादार यांनी कारभार पहिला.मात्र उपनगराध्यक्ष बिरादार यांच्या विरोधात 26 मार्च 2025 रोजी अविश्वास ठराव दाखल करण्यात आला.त्यामुळे उपनगराध्यक्ष अरविंद बिराजदार यांनी 28 मार्च 2025 रोजी आपल्या पदाचा राजीनामा दिला.त्यांच्याजागी साईप्रसाद हिप्पाळे यांची वर्णी लागली.त्यानंतर दि.13 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी यांच्याकडे नगराध्यक्ष कपिल माकणे यांच्या विरोधात चाकूर नगरपंचायतीच्या 14 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.
नगराध्यक्ष हे नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करतात,चाकूर येथे वास्तव्यास न राहता लातूरला राहत असल्याने ते या पदासाठी वेळ देऊ शकत नाहीत त्यामुळे नगरपंचायतीच्या दैनंदिन कामकाजात विस्कळीतपणा येत आहे.नियमबाह्य पद्धतीने भ्रष्टाचारयुक्त कारभार चालवतात त्यामुळे आम्हा नगरसेवकांचा नगराध्यक्ष यांच्यावर विश्वास राहिलेला नाही असा 14 नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात आरोप केला आहे.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनावर नगरसेवक अब्दूल करीम गुळवे, मिलिंद महालिंगे, साईप्रसाद हिप्पाळे, भागवत फुले, अभिमन्यू धोंडगे,मुज्जमील सय्यद, सुजाता रेड्डी, ज्योती स्वामी, शबाना सय्यद, शुभांगी कसबे, गंगुबाई गोलावार, गोदावरी पाटील, वैशाली कांबळे,शाहिनबानु सय्यद या 14 नगरसेवकांच्या सह्या आहेत.
दोन महिन्याच्या आतच उपनगराध्यक्ष पाठोपाठ नगराध्यक्षावरही अविश्वास प्रस्ताव दाखल झाल्याने चाकूरची नगरपंचायत चांगलीच चर्चेला आली असून हा अविश्वास प्रस्ताव पारित होणार की नाही हे येणाऱ्या काही दिवसातच स्पष्ट होणार आहे.


