आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षकांनी बदलत्या शिक्षण प्रक्रियेतील शिलेदार व्हावे – प्राचार्या डॉ. भागीरथी गिरी यांचे प्रतिपादन

चाकूर : 29 फेब्रुवारी /मधुकर कांबळे
तब्बल 34 वर्षानंतर नवीन शैक्षणिक धोरण येत असून या शैक्षणिक धोरणात अमुलाग्र बदल झालेले आहेत. हे बदल शिक्षकाने समजून घेऊन शिक्षणातील बदलाला सर्वांनी स्वीकारले पाहिजे.शिक्षक बदलल्याशिवाय विद्यार्थी बदलणार नाहीत.त्यासाठी शिक्षकाने बदलत्या शिक्षण प्रक्रियेतील शिलेदार म्हणून काम करावे असे मौलिक प्रतिपादन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या डॉ.भागीरथी गिरी यांनी केले.
चाकूर तालुक्यातील महाळंग्रा येथील डी.बी. इन्स्टिट्यूट मध्ये राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण क्षमता वृद्धी प्रशिक्षण शिबिरात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेतील संजय भापकर, डी. बी. ग्रुपचे प्रशासकीय अधिकारी प्रा. श्रीहरी वेदपाठक,चाकूर तालुका प्रशिक्षण समन्वयक रविंद्र चिमणदरे यांची प्रमुख उपस्थित होती.
आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनपर भाषणात पुढे बोलताना डॉ. गिरी म्हणाल्या की शिक्षक हा अविरतपणे ज्ञान देण्याचे काम असतो.शिक्षक बुद्धिमान असून त्यांच्यामध्ये अनेक क्षमता आहेत. आता या क्षमता बाहेर काढण्यासाठीच वृद्धी करण्याची वेळ आली आहे. व त्यासाठीच हे प्रशिक्षण घेतले जात आहे.जगामध्ये दररोज बदल होत आहेत.ते बदल आपण शिक्षक म्हणून समजून घेऊन बदलाप्रमाणे बदलले पाहिजे. त्यासाठी आपण अपडेट राहिले पाहिजे.
1986 नंतर तब्बल 34 वर्षानंतर नवीन शैक्षणिक धोरण येत असून हे धोरण पुढील वीस वर्षे चालणारे आहे. त्यामुळे या नवीन शैक्षणिक धोरणाची माहिती, त्यातील तरतुदी प्रत्येक शिक्षकांना माहित असणे गरजेचे असून शिक्षकाने आपले ज्ञान अद्यावत ठेवावे.प्रत्येक शिक्षक विद्यार्थ्यांसाठी काम करत असतो. यासाठी कृतीपत्रिकेचा वापर करणे गरजेचे आहे . पाठ्यपुस्तके एक संदर्भ ग्रंथ म्हणून वापरावे.शिक्षकांनी प्रत्येक पाठ्यपुस्तकांचा वापर करून काहीतरी नवीन ज्ञान विद्यार्थ्यांना सांगणे गरजेचे आहे असेही त्या म्हणाल्या. प्रत्येक शिक्षकाला वर्षभरात किमान 50 तासाचे प्रशिक्षण घेणे अपेक्षित असून या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा जास्तीतजास्त वापर विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी करावा असेही डॉ. गिरी म्हणाल्या.एकीकडे आम्ही दहावी, बारावी, नीट सारख्या परीक्षेमध्ये लातूर पॅटर्न निर्माण केला असला तरी इतर काही शिक्षण प्रक्रियेत आम्ही फार मागे आहोत हा विरोधाभास दिसत आहे.अशी खंतही डॉ.गिरी यांनी व्यक्त केली. यावेळी संजय भापकर यांचेही समोचित मार्गदर्शनपर भाषण झाले.प्रारंभी प्रशिक्षण समन्वयक रवींद्र चिमणदरे यांनी प्राचार्या डॉ. भागिरथी गिरी यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांचा सत्कार केला. यावेळी गट साधन केंद्रातील तज्ञ साधन व्यक्ती धनराज सूर्यवंशी, प्रशिक्षणाचे सुलभक व तालुक्यातील माध्यमिक शिक्षक मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??